ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राज्यातील राजकारणामधील घराणेशाहीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिश्कील शब्दांमध्ये समाचार घेतला. याचवेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मला एका गोष्टीचा प्रचंड आनंद झाल्याचा खुलासा केला आहे.
ठाण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यामध्ये राज ठाकरेंनी एक व्यंगचित्रकार म्हणून अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. आवडता व्यंगचित्रकार, व्यंगचित्र काढताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात, बाळासाहेब, एम. एफ. हुसैन यासारख्या अनेक गोष्टींवर त्यांनी आपली मते व्यक्त केली. मात्र त्याचवेळेस त्यांनी काही प्रश्नांना उत्तर देताना राजकीय फटकारेही लगावले. मुलाखतीच्या सुरुवातीलच त्यांना घराणेशाहीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देत निकालाच्या दिवशी एका गोष्टीचा विशेष आनंद झाल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ एक जागा मिळाली. १०० हून अधिक जागा लढवणाऱ्या मनसेला केवळ एका जागी यश मिळालं. असं असतानाही निकालाच्या दिवशी आपल्याला एक गोष्टी आनंद झाला असं वक्तव्य राज यांनी केलं आहे.
पाहा फोटो >> राज ठाकरेंनी दोन वर्षांमध्ये भाजपाविरोधीत काढलेली व्यंगचित्रे
काय आहे ती गोष्ट?
भारतीय राजकारणामध्ये घराणेशाही आहे. या घराणेशाहीची गोडपेक्षा कडू फळे अधिक चाखायला मिळत आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे असा प्रश्न राज यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. “कुठलीही गोष्ट लादून होत नसते. उद्या मी माझ्या मुलाला राजकारणात आणलं. किंवा इतर कोणी त्यांच्या मुलाला किंवा मुलीला आणलं. तरी तुम्ही केवळ त्यांना राजकारणात आणू शकता. मात्र मान्य करायचं की नाही हे जनतेवर असतं,” असं मत राज यांनी व्यक्त केलं.
राज ठाकरेंची खंत, “छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचं माझं स्वप्न आहे पण…”https://t.co/fUxsOrs2Fi
“चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन माझं पहिलं प्रेम”#RajThackeray #MNS #Maharashtra #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #Movie— LoksattaLive (@LoksattaLive) March 2, 2020
अनेक मतदारसंघ इतक्या पक्क्या पद्धतीने बांधले आहेत की तिथे बापाचा मुलगा निवडून येतोच, याबद्दल तुमचं काय मत आहे? असं राज यांना विचारण्यात आलं. त्यावेळी, “अनेकजण निवडणुकीमध्ये पडले पण आहेत. समोरचा जर कमोजरच निघाला तर त्याला काय करता येणार,” असा सवाल राज यांनी उपस्थित केला. “मतदान झालं तो निवडून आला तर तो मनातून स्वीकारला आहे असं होतं नाही. तो व्यक्ती रस्त्याने फिरताना लोकं समोरुन येऊन नमस्कार करतायत का?, जिव्हाळ्यानं बोलतायत का? हे पहावं,” असंही राज पुढे बोलताना म्हणाले. “राजा तशी प्रजा की प्रजा तशी राजा नक्की काय आहे असं मला प्रश्न अनेकदा पडतो. निवडणुकांनंतर समाजाचा अपमान होताना दिसतोय तरी लोकं त्यांना मत करत असतील तर ती चूक त्या व्यक्तीची (उमेदवाराची) नाही. तर ती चूक १०० टक्के लोकांची आहे. खरं तर मला या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी खूप आनंद झाला होता. ज्यांनी अनेक पक्षांतरे केली या सर्व लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आणि घरी बसवलं आहे, याचा मला आनंद झाला,” असं राज म्हणाले.