तूरखरेदीवरुन शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा असून भाजपच्या दानवाकडून त्यांना अपेक्षा नाही अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा समाचार घेतला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूरखरेदीवरुन असभ्य भाषेचा वापर करुन वाद ओढावून घेतला होता. राज्य सरकारने १ लाख टन तूरखरेदी केली तरी रडता, रडे धंदे करु नका, तुरीला असं झालं, कापसाला तसं झालं, जे केलं ते सांगा. हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर सरकार २५ टक्के माल खरेदी करत असते असे दानवेंनी म्हटले होते. मात्र हे सांगताना दानवेंनी अपशब्दांचा वापर केला होता.

दानवेंच्या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी प्रतिक्रिया दिली. ‘शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत’ असा टोला त्यांनी लगावला. मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनीदेखील दानवेंच्या विधानावरुन भाजपवर टीका केली. शेतकऱ्यांना पिकांना हमीभाव, कर्जमाफी अशी खोटी आश्वासने देऊन भाजप सत्ते आली. पण या आश्वासनांची पूर्तता सोडा, पण शेतकऱ्यांविषयी अर्वाच्य भाषेचा वापर करण्यापर्यंत भाजप नेत्यांनी मजल गाठली आहे. सत्तेतून येणारी मुजोरी यातून दिसून येते असे अविनाश अभ्यंकर यांनी म्हटले आहे.

दानवेंना बेताल विधान करायची हौस असेल तर दुरदर्शनच्या एखाद्या विनोदी कार्यक्रमात जाऊन हौस भागवावी, पण शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा उद्योग त्यांनी करु नये असेही मनसेने म्हटले आहे. दानवेंनी शेतकऱ्यांची हात जोडून शंभर वेळा माफी मागावी हीच त्यांची शिक्षा ठरेल असे अभ्यंकर यांनी सांगितले.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेनाही दानवेंविरोधात आक्रमक झाली आहे. उस्मानाबाद, डोंबिवली या शहरांमध्ये शिवसेनेने दानवेंचा निषेध केला. उस्मानाबादमध्ये शिवसेनेने दानवेंच्या पुतळ्याचे दहन केले. तर डोंबिवलीत दानवेंच्या पुतळ्याची धिंड काढण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही दानवेंच्या विधानाचा निषेध दर्शवला आहे. वाद चिघळण्याची शक्यता दिसताच दानवेंनी गुरुवारी दुपारी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.