“आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

“आपण तरी बेसावध राहू नका, सावधपणे…” शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट
सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांचे खास पोस्ट करुन कौतुक केलं आहे. दुपारीच राज यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख आणि कालच राजीनामा दिलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारी पोस्ट केल्यानंतर शिंदेंच्या शपथविधीच्या काही मिनिटांमध्येच त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट केलीय.

राज यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये एकनाथ शिंदेंना शुभेच्छा देणारी पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “एकनाथ शिंदेजी, आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपले अभिनंदन. खरंच मनापासून आनंद झाला,” असं म्हटल आहे. पुढे बोलताना त्यांनी, “नशिबाने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. आता ती स्वकर्तृत्वाने सिद्ध कराल अशी आशा,” असंही म्हटलं आहे. तर पोस्टच्या शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांना सूचक इशारा देताना, “आपण तरी बेसावध राहू नका. सावधपणे पावले टाका,” असंही म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

पाहा व्हिडीओ –

राजभवनामध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला भाजपाचे अनेक नेते उपस्थित होते. बंडखोर आमदार अद्याप गोव्यामध्ये असल्याने शिवसेनेकडे अगदीच मोजके लोक या सोहळ्याचा उपस्थित असल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मोदींचा फोन, फडणवीस अन् उपमुख्यमंत्रीपद; शपथविधीच्या काही मिनिटं आधी नेमकं घडलं काय?
फोटो गॅलरी