महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नूतनीकरणाच्या विषयावर सत्ताधारी गटातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनीच धारेवर धरत सभागृहात खालीच बसकण मारत निषेध नोंदवला. सर्वसाधारण सभा संपेपर्यंत या सदस्यांनी हा ठिय्या सुरूच ठेवल्याने महापौर संग्राम जगताप यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राज्य महिला कुस्ती स्पर्धेला १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत शहरातील ८३ रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, त्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा निर्णयही मंजूर करण्यात आला.
मनपाची सर्वसाधारण सभा बुधवारी महापौर संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमहापौर सुवर्णा कोतकर, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे या वेळी उपस्थित होते. अवघ्या ४५ मिनिटांत ही सभा आटोपली. सभेसमोरील काही विषय न वाचताच मंजूर करण्यात आले. स्थायी समितीवरील ८ सदस्य नियुक्त करण्यासाठी उद्या (गुरुवार) पुन्हा मनपाची सभा बोलावण्यात आली आहे.
सभेची सुरुवातच मनसेच्या नगरसेवकांमुळे वादळी झाली. मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, वीणा बोज्जा व कैलास गिरवले हे सर्व महापौरांच्या आधीच सभागृहात आले, मात्र खुर्च्यांवर बसण्याऐवजी त्यांनी सभेत जमिनीवरच बसकण मारत सभागृहाच्या नूतनीकरणाच्या कामाकडे लक्ष वेधून घेतले. गेल्या सभेतच याबाबत आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते झाल्याने हा ठिय्या दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्याने जगताप संतप्त झाले. हे काम मंजूर करणारे आणि ते पूर्ण करणारेही आपणच आहोत. त्यासाठी अशी भूमिका घेणे योग्य नाही, असे सांगत जगताप यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र भूमिकेवर ठाम राहात या नगरसेवकांनी सभा संपेपर्यंत जमिनीवरची बसकण सोडली नाही.
या सभेला मनपाचे काही अधिकारीच उशिरा आले. त्यांची जगताप यांनी चांगलीच कानउघडणी केली. दि. १८ व १९ ला शहरात राज्य महिला कुस्ती स्पर्धा होणार आहेत, त्यासाठी १५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यास सभेतच मान्यता देण्यात आली. अभियंता सातपुते यांच्यावरील कारवाईबाबत शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला बगल देत हा विषय गुंडाळण्यात आला. शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र गेल्या सभेतच यावर चर्चा झाल्याचे सांगत विषय येथेच सोडून दिला.