ठाण्यात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्या. राज ठाकरेंमध्ये एक कलाकार उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या मुलाखतीमध्ये मुलाखतकार अंबरीश मिश्र यांनी केला. मुलाखतीमध्ये राज यांनी व्यंगचित्र काढतानाचे अनुभव, आवडता व्यंगचित्रकार, बाळासाहेब, एम. एफ. हुसैन यांच्यापासून ते शाळा आणि कॉलेजमधील आठवणींपर्यंत अनेक गोष्टींसंदर्भातील किस्से आणि आठवणी सांगितल्या. यावेळेस बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याबद्दल भाष्य केलं. या विषयावर बोलतानाच त्यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना राज यांनी टोमणा मारला.

गांधी चित्रपटाबद्दल म्हणाले…

राज ठाकरे यांनी गांधी हा चित्रपट आपल्याला प्रचंड आवडतो असंही या मुलाखतीमध्ये सांगितलं. “एकदा ‘प्लाझा’ला मी गांधी चित्रपट पहायला गेलो होतो. तो चित्रपट पाहिल्यावर मी भारावून गेलो. मी इतका भारावलो होतो की त्यानंतर मी गांधी हा विषय वाचायला घेतला. तो चित्रपट मी प्लाझा थेअटरला ३० ते ३२ वेळा पाहिला असेल. गांधी चित्रपट तुम्ही जितक्या वेळा पहाल तितक्या वेळेला तो तुम्हाला नवीन सांगतो. तो तुम्हाला चित्रपटाचं टेक्निक सांगतो. एका माणसाचं आयुष्य तीन तासांमध्ये जगाला सांगायचं सोप्पी गोष्ट नाहीय”, असंही राज यावेळी म्हणाले.

शिवाजी महाराजांवर चित्रपट…

गांधी या चित्रपटाचा प्रभाव राज यांच्यावर इतका होता की तो चित्रपट पाहून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचा विचार केला होता. “मी कॉलेजला असताना गांधी पाहिला. गांधी पाहिल्यानंतर तेव्हा पासूनचं माझं एक स्वप्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट करावा. कॉलेजमध्ये असल्यापासूनचं चित्रपट निर्मिती, चित्रपट दिग्दर्शन हेच माझं पहिलं प्रेम होतं. खरंतर मी अॅनिमेशन चित्रपट करावा. वॉल्ट डिन्से स्टुडिओमध्ये जाऊन अॅनिमेटर म्हणून चित्रपट करावा अशी माझी इच्छा होती. पण त्यावेळेला आतासारखी माध्यमे नव्हती. कोणाला पत्र लिहियाचं कोणाशी बोलायचं. काय करायचं काहीच माहिती नव्हतं. पण गांधी पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवायचा असं वाटलं आणि त्यानंतर मी महाराज पण जास्त वाचायला सुरुवात केली. महाराजांवर खूप वाचलं. बरचं वाचल्यानंतर महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवला तरी जेवढा भालजींनी केला तेवढचं तुम्ही चित्रपटामध्ये दाखवू शकता. तीन तासांमध्ये महाराजांच्या व्यक्तीमत्वाचे इतर जे कंगोरे आहे ते तुम्ही दाखवू शकत. शिवाजी महाराज एक व्यक्ती म्हणून लोकांसमोर आणताना फक्त अफझलखान, शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका आणि पन्हाळ गडावरुन वेढा तोडून बाहेर पडणं या चार घटनांपुरतं मर्यादित नाहीय. शिवाजी महाराजांना आपण फक्त या चार घटनांवर बघतो. या चार घटनांच्या व्यतिरिक्त त्यांचे परराष्ट्रधोरण कसं होतं, त्यांनी स्वत: मराठी भाषा कोष निर्माण केला, स्वत:चं चलन निर्माण केलं, मंत्रिमंडळाची निर्मिती केली. हे असं सर्व तीन तासांमध्ये दाखवणं शक्य नाही,” असं राज यांनी सांगितलं.

पाहा फोटो >> राज ठाकरेंनी दोन वर्षांमध्ये भाजपाविरोधीत काढलेली व्यंगचित्रे

फडणवीसांना टोला…

राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाजारांवरील चित्रपट बनवताना इतर गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत हे सांगत होते. त्यावेळी त्यांनी राज्य कारभाराची घडी नीट बसावी म्हणून तयार केलेले मंत्रीमंडळ तसेच इतर जहागिरदाऱ्यांचा उल्लेख केला. “महाराजांनी त्यांचे मंत्रीमंडळ उभारलं, आपण आज जे चिटणीस, सरचिटणीस, पंतप्रधान, सरदेशमुख हे सगळे शब्द वापरतो ते महाराजांच्या काळात आले,” असं राज म्हणाले. त्यावेळी मुलाखतकार अंबरीश मिश्र यांनी राज बोलत असतानाच जहागिरदारांच्या यादीमध्ये ‘फडणवीस’ असा उल्लेख केला. त्यानंतर राज चेहऱ्यावर प्रश्नार्थक हावभाव करुन ‘फडणवीस महाराजांच्या काळात’ असं म्हणत क्षणभर थांबले. “फडणवीस हे महाराजांच्या नंतरच्या काळात साडेतीन शहाण्यांपैकी एक होते,” असा टोला पुढच्या वाक्यात त्यांनी लगावला. राज यांच्या या वाक्यानंतर सभागृहामध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

एकीकडे मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर भाजपाबरोबर मनसे युती करणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र अशातच राज यांनी मिश्कीलपणे देवेंद्र फडणवीस यांना हा टोला लगावल्याने राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.