महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंची ही सभाही गाजली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच मशिदीवरील भोंगे काढण्याचा निर्णय घ्या, असा इशारा सरकारला दिला.

“मशिदीचे भोंगे नाही काढले तर…”; राज ठाकरेंचा इशारा

दरम्यान, मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे, असं या कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज ठाकरे सभेत बोलताना म्हणाले होते की, “कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.