सांगली : मॉडेल स्कूल उपक्रमामध्ये केवळ भौतिक सुविधा वाढविणे ही अपेक्षा नसून शाळांची गुणवत्ता वाढ व्हावी, हा उद्देश असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. कारंदवाडी (ता.वाळवा) येथे मंत्री पाटील यांच्या हस्ते १ कोटी ७५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील अध्यक्षस्थानी होते. उपसभापती नेताजीराव पाटील, तहसीलदार धनश्री भांबुरे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार,जि.प.सदस्य संभाजी कचरे, पंचायत समितीचे सदस्य जनार्दन पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक श्रेणीक कबाडे, सर्वोदयचे माजी संचालक रमेश हाके,सरपंच पद्मजा कबाडे प्रामुख्याने उपस्थित होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंत्री पाटील म्हणाले,की जिल्ह्यातील १४१ शाळा पहिल्या टप्प्यात मॉडेल स्कूल उपक्रमात सहभागी करण्यात आल्या. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी तेवढय़ाच शाळांचा समावेश करण्यात येईल. शाळेची गुणवत्ता वाढ व्हावी ही अपेक्षा यामागे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. जिल्हा परिषद सदस्य कचरे म्हणाले,की कारंदवाडी, कृष्णा नगर, हाळ भागात १ कोटी ७५ लाखाच्या विविध कामांचे उदघाटन-भूमीपूजन केले आहे. २१ लाख खर्चून ग्रामपंचायतचे नूतनीकरण केले,व्यापारी संकुल बांधले आहे. गावात दोन स्वागत कमानी उभारल्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काम करीत असून गावासह मतदारसंघातील विकास कामेमार्गी लावली आहेत. प्रारंभी सरपंच पद्मजा कबाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषणात गावातील कामांचा आढावा मांडत,गावात आरोग्य उपकेंद्र व्हावे, ब वर्गातील कार्ड धारकांना रेशन मिळावे व गावातील उर्वरित रस्ते व्हावेत,अशी मागणी केली. ’राजारामबापू’चे संचालक श्रेणीक कबाडे यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model school initiative aims enhance quality schools jayant patil ysh
First published on: 08-02-2022 at 01:59 IST