मोहोळ तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीला बळजबरीने जीपमध्ये बसवून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याच्या गुन्ह्य़ात तालुक्यातील एका राजकीय पुढा-याचा मुलगा आरोपी असल्यामुळे राजकीय दबावामुळे पोलीस तपास यंत्रणा प्रामाणिकपणे तपास करीत नाही. त्यामुळे बलात्कारी आरोपींना रान मोकळे मिळण्याची भीती व्यक्त करीत, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी दुस-या पोलीस अधिका-याकडे तपास सोपविण्याची मागणी केली आहे. या प्रश्नावर महाराष्ट्र राज्य कोळी महासंघानेही वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दखल न घेतल्यास न्याय मिळण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मोहोळ तालुक्यातील कामती बुद्रूक येथे राहणारी सदर पीडित तरुणी गेल्या १७ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथे महाविद्यालयाकडे जाऊन परत येत असताना वाटेत समीर ऊर्फ पप्पू भारत गायकवाड याच्यासह अक्षय राहुल वाघमारे व इतरांनी तिला अडविले. या सर्वानी पीडित तरुणीला मारहाण करीत जीपमध्ये बळजबरीने बसविले. धावत्या जीपमध्ये समीर गायकवाड याने सदर तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर इतर साथीदारांनी तिचा विनयभंग केला. ही जीप नंतर सोलापूरमार्गे लातूर जिल्ह्य़ात औसा रस्त्यावर नेण्यात आली. त्या ठिकाणी गायकवाड व त्याच्या साथीदारांनी तिला एकटीला सोडून पलायन केले. या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली तरी पोलीस तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करीत नाही. आरोपींनी गुन्ह्य़ात वापरलेली जीप गाडी व अन्य तीन मोटारसायकली अद्यापि जप्त होत नसून या वाहनांचा वापर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या नाकावर टिच्चून आरोपींचे नातेवाईक करीत आहेत. तर पोलिसांनीही केवळ दोनच आरोपींना अटक केली असून इतर आरोपी मोकाट असल्याचे पीडित तरुणीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मुख्य आरोपीचे वडील हे स्थानिक स्वराज्य संस्थेत सभापती असून त्यांचे राजकीय वजन आहे. त्यामुळे राजकीय दबाव तंत्राचा वापर करून पोलीस तपास यंत्रणेच्या कामात अडथळा आणला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाने केला आहे.