बोईसरजवळील मान गावाता एक माकडाने गेल्या काही महिन्यांपासून उच्छाद मांडला असून त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या माकडामुळे गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हे माकड घराच्या कौलावर व छपरावर चढून वावरत असल्याने काही घरांच्या छपराचे नुकसान झाले आहे. तसेच लहान मुलांकडे खाद्यपदार्थ असल्यास माकडे अशा मुलांवर हल्ला करण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका माकडाचा डोक्यावर अलीकडच्या काळात जखम झाली असून हा माकड ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे माकड पिसाळलेले असल्याने त्याला पकडून त्याच्यावर उपचार करणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र आपल्या मागणीकडे वनविभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मान हनुमान मंदिराजवळ एक माकड वास्तव्य करत असून त्याला गावच्या मुलांनी खाद्यपदार्थ देण्याची सवय लावली. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या शोधात हे माकड गावांमध्ये फिरत असते. या माकडाला खाद्यपदार्थ देऊ नये अशी विनंती वेळोवेळी आम्ही करत असतो. त्याचे पालन झाल्यास हे माकड पुन्हा जंगलामध्ये निघून जाईल. – निलेश मोरे, वनक्षेत्रपाल, बोईसर