कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारांचा अंदाज

नेर्ऋत्य मोसमी पावसासाठी राज्यात पोषक स्थिती निर्माण होत असून, गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा काहीसा जोर धरला आहे. राज्याच्या सर्वच भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडणार असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झाल्यानंतर राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आदी भागांमध्ये चांगला पाऊस होत असताना महाराष्ट्रात पावसाने ओढ दिली होती. मात्र, सद्यस्थितीत राज्यातही पावसासाठी काहीशी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. १३ आणि १४ ऑगस्टला कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.

पाऊसमान : गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील प्रमुख ठिकाणी नोंदविलेला पाऊस (मि. मी.) पुढीलप्रमाणे- कोकणातील मंडणगड ९०, सावंतवाडी ६०, माथेरान ५०, जव्हार, लांजा ४०. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर ११०, लोणावळा ८०, राधानगरी ७०, चांदगड  ६०, गगनबावडा, इगतपुरी ५०, वेल्हे ४०. मराठवाडय़ातील धर्माबाद १००, किनवट ७०, बिलोली ५०, मुखेड ४०, हिमायतनगर, माहूर, मुखेड, उमरी ३०.  लातूर, उदगीर २०. विदर्भातील भामरागड २२०, सिरोंचा ११०, अहिरी, एटापल्ली, कोपर्णा १००, बल्लारपूर ९०, धानोरा ८०, ज्योती ७०, आरमोरी, गडचिरोली, मूलचेरा, राजुरा ६०, चामोशी, देसाईगंज ५०. घाटमाथा परिसरातील दावडी १४०, अम्बोणे १००, शिरगाव, ताम्हिणी ९०.