मानवी हस्तक्षेप, शिकार आणि जंगलतोडीमुळे जगभरातील पक्ष्यांच्या १ हजार प्रजाती नामशेष झाल्याचा धक्कादायक अहवाल ‘जीवाष्म डाटा’च्या आधारावरून देण्यात आला आहे. आदिम काळापासून मानवाने प्रगतीची नवी शिखरे गाठली असली तरी वसाहतीकरणाच्या वादळात निसर्गावर कु ऱ्हाड चालविली जात असल्याने जमिनीवरील पक्षी प्रजातींचे मोठय़ा प्रमाणात नष्टचर्य सुरू आहे. पक्ष्यांच्या आजवरच्या उपलब्ध जीवाष्मांच्या आकडेवारीवरून प्रगतशील मानवाचा पर्यावरणातील वाढता हस्तक्षेप खुलेपणाने समोर आला आहे.
पक्षीतज्ज्ञांनी पॅसिफिक महासागराच्या पट्टय़ातील पक्षी प्रजातींची आकडेवारी गोळा केली असून प्रोसिडिंग्ज ऑफ द अॅकेडमी ऑफ सायन्सेसने हा अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. मानवी वसाहतींच्या विस्तारात हजारोंच्या संख्येने पक्षी प्रजाती अक्षरश: नामशेष झाल्या असून त्यापैकी काही फक्त चित्रातूनच पाहण्यास मिळणार आहेत. पक्ष्यांच्या उपलब्ध जीवाष्मांवरून हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला असला तरी शेकडो पक्ष्यांचे जीवाष्म ओळखण्याच्या स्थितीत नसल्याने यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
मानवी हस्तक्षेपाचा सर्वाधिक तडाखा पक्ष्यांना बसल्याचे यातून सिद्ध झाले आहे. पॅसिफिक महासागराच्या पट्टय़ातील देशांमध्ये पक्षी नष्टचर्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. पहिल्या मानवाच्या जन्मापासून ते युरोपातील वसाहतीकरणाच्या अत्युच्च कालखंडादरम्यान पक्ष्यांची अपरिमित शिकार झाली. प्रचंड वृक्षतोड करण्यात आली. हा काळ ३५०० ते अलीकडच्या ७०० वर्षांपूर्वीचा असून या कालखंडातील विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे जीवाष्म गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. या जीवाष्मांची संख्या धक्कादायक असून प्राथमिक निष्कर्षांनुसार जमिनीवर वास्तव्य करीत असलेल्या दोन तृतीयांश पक्ष्यांची नंतरची पिढी अस्तित्वात येणे आता दुरापास्त आहे. पॅसिफिक महासागरातील बेटांवर या प्रजाती एकेकाळी मोठय़ा संख्येने अस्तित्वात होत्या. विविध कारणांनी या नामशेष झाल्या. उपलब्ध जीवाष्म आकडेवारी पाहता नष्टचर्याची तीव्रता पॅसिफिकच्या पट्टय़ात अधिक दिसून आली आहे. अनेक बेटांवरील पक्षी जीवाष्मांच्या नोंदी अपूर्ण राहिल्या आहेत. काही जीवाष्मांची स्थिती ओळखण्याइतपत चांगली नसल्याने त्याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती कॅनबेरा विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ रिचर्ड डंकन यांनी अहवाल सादर करताना दिली आहे. नष्ट झालेल्या पक्षी प्रजातींचा नष्टचर्याचा नेमका काळ आणि कारणांचाही डाटा तयार करण्यात आला आहे. सध्याची आकडेवारी उपलब्ध माहिती आणि प्राप्त झालेल्या जीवाष्म नोंदींच्या आधारावरून तयार करण्यात आली आहे. पॅसिफिक महासागरातील ४१ बेटांवरील मानवी वसाहतींमुळे पक्षी प्रजाती समूळ नामशेष झाल्या असून या पक्ष्यांची अपरिमित शिकार करण्यात आली. मोठय़ा आकाराचे, उडू न शकणारे पक्षी एकेकाळी मोठय़ा संख्येने न्यूझीलंडच्या मोआ येथे अस्तित्वात होते. या पक्ष्यांचे जमिनीवरील वास्तवच त्यांच्यासाठी धोकादायक ठरले. या पक्ष्यांची शिकार करणे सहजशक्य होते. त्यामुळे त्यांनाच लक्ष्य बनविण्यात आले, असेही अहवालात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2013 रोजी प्रकाशित
वसाहतीकरणाच्या हव्यासात जगातील एक हजार पक्षीप्रजातींचा समूळ विनाश
मानवी हस्तक्षेप, शिकार आणि जंगलतोडीमुळे जगभरातील पक्ष्यांच्या १ हजार प्रजाती नामशेष झाल्याचा धक्कादायक अहवाल ‘जीवाष्म डाटा’च्या आधारावरून देण्यात आला आहे.
First published on: 03-04-2013 at 03:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More then one thousands birds genus ends around the worlds because of colonisation