मुस्लीम समाजाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
चंद्रपूर : जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर काही कट्टरपंथीयांकडून समाज माध्यमांवर विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवून मुस्लीम समाजाविषयी गैरसमज पसरवण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या मशिदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मशिदीत कशाप्रकारे प्रार्थना केली जाते, याची माहिती सर्वधर्मीय बांधवांना व्हावी, या उदात्त हेतूने ‘मास्को’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून येथील अॅड. फरहाद बेग उद्या, गुरुवारपासून ‘मशीद सबके लिये’ या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करीत आहेत.
या देशात मुस्लिमांबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज पसरवण्यात येत आहेत. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर वकिलांच्या समाज माध्यमावरील एका ग्रुपवर मशिदीमध्ये तलवारी, बंदुका, गोळय़ा तथा मोठय़ा प्रमाणात शस्त्र सापडल्याचे संदेश पसरवण्यात आले. केवळ हेच नाही तर मशिदीमध्ये देशविरोधी काम सुरू असते, अशा प्रकारचा अपप्रचार सुद्धा समाज माध्यमातून सुरू आहे. या सर्वाला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि मुस्लीम समाज, मशीद तथा इतर समाजाबद्दल जी सामाजिक द्वेशभावना पसरवली जात आहे, ती थांबवता यावी, यासाठी येथील अॅड. फरहाद बेद यांनी पुढाकार घेतला आहे. मुस्लीम शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना (मेस्को)च्या माध्यमातून हिंदू, शीख, इसाई, बौद्ध तथा इतर सर्व धर्मीयांना मशीद, मुस्लीम समाज, त्या समाजाचा इतिहास तथा इतर सर्व गोष्टींची माहिती व्हावी यासाठी गुरुवारपासून दुपारी ४ वाजता ‘मशीद सबके लिये’ हा उपक्रम राबवत असल्याचे अॅड. बेग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना अॅड. बेग म्हणाले, मला हिंदू समाजाबद्दल तथा रामायण, महाभारत या ग्रंथाबद्दलची माहिती आहे. मी ते ग्रंथ वाचन सुद्धा केले आहेत. त्याचप्रमाणे गंगा, यमुना तथा भारतातील नद्यांची संस्कृतीही माहिती आहे. त्याला कारण मी एक भारतीय आहे. हिंदू, शीख, बौद्ध तथा इतर धर्मीयांना मुस्लीम समाज, मशीद, नमाज या सर्व गोष्टींची माहिती व्हावी, यासाठीच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाबद्दल जो काही गैरसमाज समाज माध्यमावर पसरवला जात आहे तो दूर होईल, दोन धर्मातील वैरत्व कमी होईल आणि सामाजिक सद्भावना नांदेल हाच उद्देश आहे. मशिदीमध्ये नमाज कशा पध्दतीने होते, तेथील ग्रंथ, धार्मिक पुस्तके, मोहरम याचीही माहिती या माध्यमातून दिली जाणार आहे. या उपक्रमात शहरातील सर्व धर्मातील प्रतिष्ठित नागरिक,धर्मगुरू, सामाजिक संघटना, विविध समाजाचे प्रमुख व्यक्ती, कुटुंब, व्यावसायिक, वकील, पत्रकार, प्राध्यापक यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. हा उपक्रम वर्षभर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या गुरुवारी राबवला जाणार आहे. यात मास्कोचे सर्व सदस्य सहभागी होणार आहेत. कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँके समोरील मशिदीमधून हा उपक्रम सुरू होईल.