विजय पाटील, लोकसत्ता

कराड : सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाची पडझड सुरूच आहे. मंत्री शंभूराज यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जुने-जाणते शिवसैनिकही वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. लोकप्रतिनिधी, स्थानिक प्रभावी नेत्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याने जिल्ह्यात ठाकरे समर्थक म्हणून कोण उरणार, हा सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय झाला आहे.

जिल्ह्यातील विधानसभेच्या आठपैकी दोन मतदारसंघांवर वर्चस्व तसेच ‘गाव तिथे शाखा’, प्रभागनिहाय संघटन असलेल्या शिवसेनेचे पाटणचे विधानसभा सदस्य, मंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनीच सर्वप्रथम बंडाचा झेंडा फडकवल्याने उद्धव ठाकरेंनी जनाधाराचे दोन नेते गमावलेत, तर महाविकास आघाडीत राज्यमंत्री असलेल्या शंभूराजेंना कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळाल्याने त्यांच्या कामाचा झपाटाही वाढलेल्याचा शिंदे गटाला फायदा होत आहे.

हेही वाचा >>> “चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील. त्यामुळे त्यांना घरच्या मैदानावर म्हणून आपल्या नेतृत्वाचा राजकीय प्रभाव ठेवणे स्वाभाविक असल्याने त्यांची संघटन बांधणी गती घेऊन आहे. पूर्वीपासून अनेकांशी असलेले थेट संबंध आणि सेनेतील वरिष्ठांच्या धोरणावर नाराज असलेल्या मंडळींना एकत्र करून मुख्यमंत्री शिंदे हे आपला गट विस्तारत आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांबरोबरच क्रियाशील शिवसैनिकालाही शिंदे गटात सामील करून सक्रिय केले जात आहे. शिंदे गटात सहभागी होणारे बहुतेक जण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच विशेषत: संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शिवसेनेचे प्रमुख संघटन असलेल्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी संपर्कप्रमुखांवर नाराजी व्यक्त करीत नुकताच आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे नेतृत्व स्वीकारले. मंत्री शंभूराज व जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेतेही या वेळी उपस्थित होते. रणजितसिंहांसह महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संभाजीराव पाटील, माथाडी विभागाचे जिल्हाप्रमुख प्रशांत शिंदे आदींसह सात उपजिल्हाप्रमुख व पंधरा तालुका प्रमुखांनी शिंदे गटाला बळ दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील ‘कराड उत्तर’मधील उमेदवार व ‘वर्धन अ‍ॅग्रो’चे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनीही ठाकरे गट सोडत भाजपत प्रवेश केला आहे. एकंदरच शिवसेनेच्या ठाकरे गटातील गळती पाहता उद्धव ठाकरे यांच्यापुढे  आव्हान ठाकले आहे.