यंग चांदा ब्रिगेडची मुबलक पाणी देण्याची मागणी

चंद्रपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात यावे, या मागणीकरिता सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करून महापालिका समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी सदर मागणीबाबतचे निवेदनही मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जितेश कुळमेथे, विश्वजित सहा, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे शहर प्रमूख सलीम शेख, राशीद हुसैन, हेरनन जोसेफ, नितीन साहा, तिरुपती कलगुरुवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दर वर्षीच्या उन्हाळ्यात चंद्रपूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यंदाच्या उन्हाळ्यातही हिच परिस्थिती असून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच भटकंती करावी लागत आहे. परिणामी नागरिकांमध्ये मनपाप्रती रोष आहे. काही भागात महापालिकेच्या वतीने पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सदर टँकर येताच नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. अशात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचीही शक्यता निर्माण होत आहे.

सुरळीत पाणीपुरवठा करा

संपूर्ण शहरासह बाबूपेठ, भिवापूर, रहैमतनगर, बगड खिडकी, इंडस्ट्रीयल वार्ड, वडगाव वार्ड या भागात पाण्याची अधिक टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी द्या, या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले आहे.