अहिल्यानगर: शहरातील आनंदीबाजार भागात धार्मिकस्थळाच्या तोडफोडीची घटना सामाजिक सलोखा व बंधुत्वाला धक्का देणारी आहे. या घटनेची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, अथर खान, प्रा. सीताराम काकडे, नलिनी गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार लंके यांनी निवेदनात नमूद केले की, अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेले हे धार्मिकस्थळ हे दोन्ही समाजांचे सामूहिक श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी झालेल्या तोडफोडीने असामाजिक प्रवृत्तींचा सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न दिसतो. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, मात्र चौकशी वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. अलीकडेच राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली. अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्याने अस्वस्थता वाढत आहे.

अशा सलग घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्याच्या चौकटीत ठोस उपाययोजना कराव्यात, संवेदनशील भागांमध्ये पर्याप्त पोलीस बंदोबस्त ठेवून अफवांना आळा घालावा, दोन्ही समाजांत सलोखा टिकवण्यासाठी पोलिसांनी संवाद व बैठकांचे आयोजन करावे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तणावाला तातडीने नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. आनंदीबाजार, चितळे रस्ता, तेलीखुंट, मुकुंदनगरसह संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करावा, उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणांवर सतत गस्त घालावी, महिला, लहान मुले व वृध्दांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त पथके व महिला पोलीस उपस्थिती वाढवावी, अफवांवर नियंत्रण आणावे आदी मागण्या खासदार लंके यांनी केल्या आहेत.

गेल्या रविवारी शहरातील आनंदी बाजारभागात धार्मिक स्थळाची तोडफोड करण्याची घटना घडली. पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयीतांना अटक केली आहे. मात्र मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. शहरात महापालिकेच्या आगामी निवडणुकांची वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरत धार्मिक तणावाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आजपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. गणेशोत्सवाकडे राजकीय पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने पाहत आहेत. त्यामुळे उत्सव काळातही आक्षेपार्ह फलक फडकवण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांना अधिक काळजीपूर्वक काम करावे लागणार आहे.