अलीबाबा आणि चाळीस चोर असं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना म्हटलं जातं आहे. खरी शिवसेना कुठली हे बघायचं असेल तर निवडणूक घ्या असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आव्हान दिलं आहे. काल जे कसबा मतदारसंघात झालं ते २०२४ मध्ये देशभरात होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
कसबा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला कारण
ज्यांना तुम्ही चिन्ह आणि पक्ष दिलात तर भाजपाचा उमेदवार कसबा मतदारसंघात जिंकला असता. शिवसेनेची सुमारे ३५ ते ४० हजार मतं तिथे आहेत. पण ते सगळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मानतात. कागदावरच्या शिवसेनेला ते मानत नाहीत असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. जो निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे तो लोकांना पटलेला नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या कुणाची कशी होऊ शकते? उदक सोडल्याप्रमाणे शिवसेना कुणाला तरी बहाल केली हे लोकांना आवडलेलं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भाजपासोबत आमची युती मनापासून होती
भाजपासोबत आमची युती होती. आम्ही मनापासून युती केली होती. त्यावेळी आम्ही ज्या चुका केल्या आता त्या चुका होणार नाहीत. निवडणूक आयोगाने शिवसेना जरी कुणाला दिलेली असली तरीही जनता आमच्यासोबत आहे. ओरिजनल शिवसेना आमचीच आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर असा उल्लेख एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांचा केला जातो आहे. महाराष्ट्रातली जनता आमच्यासोबत आहे.
लोकांच्या मनात प्रचंड राग आहे
शिवगर्जना यात्रा सध्या सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे तर फक्त शिवसैनिक नाही तर सामान्य लोक आणि सगळ्या पक्षांचे लोक हा अन्याय आहे हे सांगत आहेत. ठाकरे आणि शिवसेना वेगळी कशी काय होऊ शकते? फोन टॅपिंगबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केलं. राहुल गांधी यांचाच नाही तर माझाही फोन टॅप केला गेला. अशा प्रकारे फोन टॅप करणं गैर आहे. पेगासॅस प्रकरणात मी पण आहे. माझ्यासह अनेक लोकांचे फोन टॅप केले. ज्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले होते त्यांच्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला होता. मात्र नवं सरकार येताच त्यांच्या विरोधातले गुन्हे रद्द करून त्यांना बढती देण्यात आली असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.