वाई: सातारा शहरातील व हद्दवाढ भागातील रखडलेली विकास कामे तातडीने मार्गी लावा, यासाठी निधी उपलब्ध आहे.त्यामुळे विकासकामांमध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही. प्रशासनाने नियोजित व हद्दवाढ भागातील पायाभूत कामे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी, अधिकारी व हद्दवाढ भागातील नागरिकांच्या उपस्थितीत  खा. उदयनराजे यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. या वेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे, मनोज शेंडे, किशोर शिंदे, वसंत लेवे, सुहास राजेशिर्के, राजू भोसले, सुजाता राजेमहाडिक, स्मिता घोडके, निशांत पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा  घेऊन खा. उदयनराजे म्हणाले,की शहरात रस्ते, गटारे, दिवाबत्ती अशी कामे प्रगतिपथावर आहेत. नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या दरे, शाहूपुरी, शाहूनगर, खेड, विलासपूर या भागातही अशी कामे गतीने व्हायला हवीत. शासनाकडून नुकताच या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पालिकेने पायाभूत कामांची यादी तयार करून ती टप्प्याटप्प्याने मार्गी लावावीत.

काम सुरू करण्यासाठी कार्यादेश देऊनही काही कामे सुरू न झाल्याने खा. उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली. साहित्याचे दर वाढल्याने ही कामे काही काळ रखडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या बैठकीत नगरसेवकांसह नागरिकांनी देखील आपले गाऱ्हाणे मांडले. कािहनी शहरातील अतिक्रमणाच्या विषयावर लक्ष वेधले. हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, यादोगोपाळ पेठेतील नैसर्गिक ओढय़ावरील व इतर  अनावश्यक अतिक्रमणे तातडीने हटवावीत असे आदेश या वेळी खा. उदयनराजे यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साताऱ्यात सध्या पालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू आहे. प्रभाग रचनेवर हरकती नोंद घेण्याचे काम सध्या सुरू आहे. यावेळी लवकरच पालिका निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी बैठक आयोजित केली होती.या वेळी त्यांनी प्रभाग रचनेबाबत माहिती जाणून घेतली. प्रभागरचना अनुकूल आहे का, काही हरकती आणि आक्षेप असल्यास ते नोंदवण्याच्या सूचना उपस्थितांना केल्या. त्याच वेळी त्यांनी नगरसेवकांची मते जाणून घेत प्रभागात कोणती कामे बाकी आहेत आणि कोणती कामे करणे अपेक्षित आहे त्याचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांनी व नगरसेवकांनी  प्रभागातील लोकांची मते जाणून घेऊन अभिप्राय घेण्याच्या सूचना केल्या.