महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या शालांत परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. निकालाची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, हा निकाल पुढच्या आठवड्यात नक्की लागेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली. दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात असल्याचेही यावेळी शिक्षण मंडळाने सांगितले. बोर्डाकडून लवकरच पत्रकार परिषद घेऊन निकालाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता साहजिकच दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळातून पुढील आठवड्यात निकाल लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला २०१७ या वर्षासाठी राज्यभरातून १७.६६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.
साधारणपणे जूनच्या सुरुवातीलाच दहावीचा निकाल लागतो. मात्र, शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच ९ जूननंतर निकाल लागेल, अशी माहिती दिली होती. यावर्षी १० वीची बोर्डाची परीक्षा ७ मार्च ते २९ मार्च २०१७ या कालावधीत घेण्यात आली होती. यावेळी १७,६६,०९८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यातील १६,८९,२३९ विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच परीक्षा दिली, तर बाकीचे दुसऱ्यांदा परीक्षेला बसले होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९,८९,९०८ विद्यार्थिनी होत्या तर ७,७६,१९० विद्यार्थी होते. राज्यभरातून ४,७२८ इतक्या केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.