मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन
शेतकऱ्याच्या ताब्यात बाजारपेठ आली तरच पिकांना योग्य भाव मिळू शकेल. शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत असल्याने प्रक्रिया उद्योगास चालना देण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिली. याचाच एक भाग म्हणून राज्यात कापसाचे उत्पादन घेणाऱ्या दहा जिल्ह्य़ांमध्ये ‘इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क’ ची उभारणी करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ातील मुक्ताईनगर येथे गुरूवारी आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कृषिपूरक प्रक्रिया उद्योगाचे महत्व मांडले. जेथे पिकते तेथे त्या पिकास भाव न मिळण्याचे कारण म्हणजे त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योगच नसतात. त्यामुळे व्यापारी सांगेल तो भाव त्यांना स्वीकारावा लागतो.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात सर्वाधिक कापूस पिकत असला तरी प्रक्रिया उद्योगाअभावी कापसाला भाव मिळत नाही. देशाच्या एकूण कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३१ टक्क्य़ांचा आहे. फक्त २५ टक्के उत्पादनावरच प्रक्रिया केली जाते आणि उरलेले ७५ टक्के कापूस हा बाहेर जातो व त्यावर बाहेर प्रक्रिया होते. त्यामुळे व्यापारी व प्रक्रिया करणाऱ्यांना होणारा फायदा शेतकऱ्याला मिळत नाही. राज शासनाने कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क उभारण्याचे नियोजन असून प्रायोगिक तत्वावर अमरावती येथे पहिला प्रयोग सुरू करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्य़ातील जामनेर येथेही लवकरच असे पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
गेल्या सरकारचे सिंचन क्षेत्रातील घोटाळे सोडविण्यात वर्षांचा कालावधी गेला. जिल्ह्य़ात वाघूर, बोदवड, वढोदा हे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध करण्यात
येईल.
हरित खान्देश करण्यासाठी ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पाचा उपयोग होणार असून, यामुळे खान्देशातील सिंचन क्षेत्राचा चेहरा बदलेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार संपूर्ण पैसा देणार आहे. हा प्रकल्प झाल्यास हजारो एकर शेतीला पाणी उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले