मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाने येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित ‘युवारंग’ या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सर्वसाधारण विजेतेपद, तर ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला, विज्ञान व नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाने उपविजेतेपद प्राप्त केले.
येथील एसएलबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून सुरू असलेल्या युवक महोत्सवाचे रविवारी अभिनेत्री समिधा गुरू यांच्या प्रमुख उपस्थितीत आ. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी श्रम साधना ट्रस्टचे विश्वस्त तथा माजी आमदार रावसाहेब शेखावत होते. आ. चंद्रकांत रघुवंशी, आ. जयकुमार रावल, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, माजी महापौर विष्णू भंगाळे हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी अभिनेत्री समिधा यांनी कलावंतांनी कठीण परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सातत्य कायम ठेवल्यास यश मिळते असे नमूद केले. भवताली खूप संधी आहेत. त्याचा फायदा घ्या, शिकत राहा असा सल्लाही त्यांनी दिला. आ. पाटील यांनी आई-वडिलांना विसरू नका, असे सांगितले. शिक्षणात जेमतेम असलो तरी नाटकात आणि गायनात आपण अव्वल होतो याची आठवणही त्यांनी करून दिली. रघुवंशी, कापडणीस, कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन, भंगाळे, डॉ. अरविंद चौधरी यांचेही भाषण झाले. संघ व्यवस्थापकांच्या वतीने प्रा. रवि चव्हाण, प्रा. एम. आर. वैशंपायन, डॉ. मृणाल जोगी यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीने अर्चना राजपूत, प्रसाद जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक प्रा. सत्यजित साळवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. हर्षल कोतवाल, डॉ. पंचशील वाघमारे यांनी केले. आभार डॉ. संजय शेखावत यांनी मानले.