गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असला आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे आणि बसेससाठीची आरक्षणेही पूर्ण झाली आहेत. मात्र विघ्नहर्त्यां गणेशाच्या उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या मार्गात या वर्षी अनेक विघ्ने येण्याची शक्यता आहे. योग्य देखभाल दुरुस्तीआभावी मुंबई-गोवा महामार्गाची सध्या अक्षरश: चाळण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. मुंबई-गोवा महामार्गाची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गाला भलेमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. प्रवासी आणि वाहन चालकांना मनस्तापाला सामोर जावे लागत असताना महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीबाबत महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासन मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला जलदगतीने होणारे हे काम पुढे मंदावले आणि आता पूर्णपणे ठप्प झाले आहे. बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या रस्त्याचा खर्च ९०० कोटी रुपये इतका अपेक्षित असून हे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर आणि महावीर कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांना करत आहेत. त्या बदल्यात तब्बल २१ वष्रे प्रवाशांकडून टोलवसुली केली जाणार आहे. या रस्त्यावर ६ मोठे पूल, २४ छोटे पूल आणि २ उड्डाण पुलांचा समावेश आहे.
जून २०१४ अखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. असे असले तरी गेल्या तीन वर्षांत ३० टक्केही काम पूर्ण झालेले दिसत नाही. रस्त्यांची आणि पुलांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांचा वापर पार्किंग झोन म्हणून केला जातो आहे.
त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांना खडतर प्रवासाला सामोर जावे लागत आहे. वडखळ, कोलाड, माणगाव, हमरापूर ही वाहतूक कोंडीची ठिकाणे निर्माण झाली आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्याची जी कामे पूर्ण करण्यात आली आहे, त्याच्या दर्जाबाबतही आता प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. कारण ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे त्याच ठिकाणी रस्त्याला महाकाय खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ८४ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना चार ते पाच तास लागत आहेत. खराब रस्त्यांमुळे या मार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दिवसागणिक होणाऱ्या अपघातात निरपराध लोकांचे जीव जात आहेत गेल्या पाच वर्षांत २ हजार ९७३ अपघातांमध्ये ६८५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ५४३ जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
मात्र रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीबाबत जिल्हा प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण कमालीचे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी महामार्गाची देखभाल आणि वाहतूक नियमन याबाबत बठकांचे आयोजन केले जात असते. या बठकांमधून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. वेगवेगळ्या विभागाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला जातो. या बठकीला पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित असतात.
मात्र या वर्षी जिल्हा प्रशासनाने अशा बठकांचे आयोजन केले नाही. नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या शीतल उगले आणि पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक या प्रश्नाबाबत फारसे सजग नाहीत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाटेत सतराशे साठ विघ्ने असणार आहेत हे नक्की.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2015 रोजी प्रकाशित
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था
गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असला आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे आणि बसेससाठीची आरक्षणेही पूर्ण झाली आहेत.

First published on: 02-09-2015 at 01:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai goa highway in bad condition