Kangana Ranaut Controversy: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. भारताला १९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं वक्तव्य करुन वाद निर्माण केल्यानंतर कंगना रणौतने आता महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे. सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना महात्मा गांधींकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले नायक निवडताना विचार करा असा सल्ला दिला आहे. तसंच महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.

कंगनाचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान, महात्मा गांधींवर साधला निशाणा; म्हणाली “सत्तेची हाव असणाऱ्यांनी…”

कंगनाच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं असता किशोरी पेडणेकर यांनी ही राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं म्हटलं आहे. “भयानक आहे, भयानक आहे, ही राक्षसी वृत्तीची बाई आहे. एकावर एक एकावर एक नीचपणाचा कळस करते, त्यामुळे सकाळी सकाळी या बाईचं नावंही घेऊ नये,” असं म्हणत त्यांनी यावर जास्त भाष्य करणं टाळलं.

कंगनाने नेमकं काय म्हटलं आहे –

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ‘गांधी आणि इतर नेताजींना सोपवण्यास तयार झाले होते’ अशी या बातमीची हेडलाइन आहे. या रिपोर्टमध्ये महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा आहे.

‘तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही भूमिका घेऊ शकत नाही. निवडा आणि निर्णय घ्या’ असं या बातमीवर लिहिण्यात आलं आहे.

स्वातंत्र्यसैनिकांना त्या लोकांनी ब्रिटीशांच्या हवाली केलं ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नव्हती, मात्र सत्तेची भूक होती असंही कंगनाने म्हटलं आहे. पुढे बोलताना कंगनाने महात्मा गांधींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, “हे तेच लोक आहेत ज्यांनी आपल्याला कोणी एक कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा आणि अशाप्रकारे आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी शिकवण दिली. अशाप्रकारे स्वातंत्र्य नाही तर भीक मिळते. आपले हिरो हुशारीने निवडा”.

“महात्मा गांधींनी कधीही भगतसिंग किंवा नेताजींना पाठिंबा दिला नाही. भगतसिंग यांना फाशी व्हावी अशी महात्मा गांधींची इच्छा होती असे काही पुरावे दर्शवतात. त्यामुळे तुम्ही तुमचे हिरो योग्यपणे निवडले पाहिजे. कारण या सर्वांना तुमच्या आठवणींच्या एकाच बॉक्समध्ये ठेवणं आणि प्रत्येक वर्षी जयंतीला शुभेच्छा देणं पुरेसं नसून खरंतर मूर्खपणा, बेजबाबदारपणा आहे. प्रत्येकाला आपला इतिहास आणि आपले हिरो माहिती असायला हवेत”, असंही कंगनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याआधी कोणत्या वक्तव्यामुळे वाद झाला होता –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंगनाने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना भारताला १८९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती असं सांगत खरं स्वातंत्र्य नरेंद्र मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर मिळाल्याचं म्हटलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून कंगनाच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे.