scorecardresearch

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचे महापालिका चित्रीकरण करणार

शहरातील स्वच्छतेसाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे महापालिकेच्या पथकामार्फत चित्रीकरण केले जाणार आहे तसेच स्वच्छतेसाठी ‘आत्मनिर्भर प्रभाग योजना’ राबवली जाणार आहे.

स्वच्छतेसाठी आत्मनिर्भर प्रभाग योजना – भोसले

नगर : शहरातील स्वच्छतेसाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे महापालिकेच्या पथकामार्फत चित्रीकरण केले जाणार आहे तसेच स्वच्छतेसाठी ‘आत्मनिर्भर प्रभाग योजना’ राबवली जाणार आहे. उपमहापौर गणेश भोसले यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ व राज्य सरकारचे ‘माझी वसुंधरा’ अभियान नगर शहरात सुरू आहे. या अंतर्गत उपमहापौर गणेश भोसले यांनी बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. शंकर शेडाळे, घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

उपमहापौर भोसले म्हणाले, स्वच्छता सर्वेक्षणात आपल्याला अभियानापुरते काम करायचे नसून तर शंभर टक्के शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्यासाठी काम करायचे आहे. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी शहर स्वच्छतेसाठी चांगले काम करीत असल्यामुळेच देशात मनपाला ‘थ्री स्टार’ मानांकन मिळले आहे. आता आपल्याला ‘फाइव स्टार’ मानांकनासाठी काम करायचे आहे. त्यासाठी नगरकरांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. अजूनही काही नागरिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर प्लॅस्टिक पिशवीत कचरा आणून टाकतात. आता महापालिका कचरा टाकणाऱ्यांचे चित्रीकरण करणार आहे. याचबरोबर स्वच्छतेमध्ये ‘आत्मनिर्भर प्रभाग योजना’ राबवणार आहे.

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण झाल्यानंतर त्या त्या भागातील नगरसेवकांना बरोबर घेऊन त्या नागरिकांच्या घरी जाऊन समज दिली जाणार आहे. कचरा टाकण्याच्या ठिकाणी ‘कचरा टाकू नये’ असा फलक लावण्याचे सूचना दिल्या आहेत. याचबरोबर स्वच्छतेमध्ये लोकांचा सहभाग वाढवा, रस्त्यावरील व्यवसायिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा, महापालिकेने आता दोन जेसीबी खरेदी केले आहेत, एकएका प्रभागानुसार रस्त्यावरील राडारोडा, माती, दगड उचलण्याचे काम केले जाणार आहे. स्वच्छतेमध्ये कायमस्वरूपीचे नियोजनबद्ध उपायोजना केली जाणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, आपले शहर समजून मनपाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal corporation will shoot garbage road ysh