जेजुरी : जेजुरी येथील खोमणे आळी चौकामध्ये नव्याने बांधण्यात येत असलेल्या पाच मजली इमारतीचे बांधकाम रविवारी खचल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. पोलीस बंदोबस्तात जेजुरी नगरपालिकेच्या पथकाने ही इमारत जमीनदोस्त केली.

खोमणे आळी येथील मुख्य रस्त्यालगत पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. हे बांधकाम पूर्ण होत आले होते. रविवारी काही कामगार पाचव्या मजल्यावर काम करीत असताना इमारतीच्या तळमजल्यात जोरात आवाज आला. त्यामुळे घाबरून ते खाली पळत आले. तेव्हा इमारतीचे तीन कॉलम तुटल्याचे दिसून आले. इमारतीला काही ठिकाणी तडे गेले होते.

ही माहिती समजताच जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे,नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बांधकामाजवळील चारही रस्ते बंद करण्यात आले. आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

इमारत झुकल्याने कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जेजुरी नगरपालिकेच्या पथकाने सकाळी साडेनऊ वाजता संबंधित इमारत पाडली.

विनापरवाना बांधकाम

या इमारतीच्या बांधकामासाठी नगरपालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. २४ एप्रिल रोजी बांधकाम थांबवण्याविषयी नगरपालिकेने जागामालकाला नोटीस दिली होती. तरीसुद्धा त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते, अशी माहिती मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी दिली.

जेजुरीतील जुन्या इमारतींचे संरचनात्मक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल नगरपालिकेत दाखल करावा, अशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. नव्याने सुरू असलेल्या बांधकामांची नगरपालिकेतून परवानगी घ्यावी अन्यता संबंधित बांधकामे तोडण्यात येणार आहेत.चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी, जेजुरी नगपालिका