अहमदनगरमधील रमेश मुनोत व चित्रा रमेश मुनोत या ज्येष्ठ दाम्पत्याची अत्यंत नियोजनबद्ध आणि कटकारस्थान रचून निर्घृण हत्या करून दरोडा टाकल्याप्रकरणातील पाच जणांची जन्मठेप कायम ठेवत सुरक्षारक्षक असलेल्या मुख्य सूत्रधाराची शिक्षा फाशीत परिवर्तित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी शुक्रवारी दिला.

याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयातील काही प्रकरणांच्या आधारे आणि सुरक्षारक्षकच भक्षक होण्यासारखी दुर्मिळ घटना म्हणून नोंद घेत अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण देशमुख यांनी युक्तिवादात मूख्यसत्रधार शिवकुमार याला फाशीची शिक्षा देण्याची विनंती खंडपीठाकडे केली होती. शिवकुमार रामसुंदर साकेत, असे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तर राजू दराडे, शैलेंद्रसिंग ठाकूर, राजेशसिंग ठाकूर, संदीप पटेल व बलेंद्रसिंग ठाकूर, अशी जन्मठेप कायम ठेवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राजू दरोडो हा अहमदनगर जिल्ह्यातीलच रहिवासी तर शिवकुमारसह इतर चौघे हे मध्यप्रदेशातील रेवा जिल्हयातील रहिवासी आहेत.

अहमदनगरच्या चंदन इस्टेटमधील माणिकनगर भागात राहणारे व्यावसायिक रमेश मुनोत व चित्रा मुनोत यांची ३ डिसेंबर २००७ रोजी घरातच अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. फाशी झालेला आरोपी शिवकुमार हा रमेश मुनोत यांच्याकडे दिवसपाळीचा सुरक्षारक्षक (वॉचमन) म्हणून काम करत होता. तर इतर आरोपींनीही मुनोत यांच्याकडे सुरक्षारक्षकासह चालक आदी प्रकारची इतरही कामे केलेली होती. त्यामुळे मुनोत कुटुंबीयांबाबतची सर्व माहिती आरोपींकडे होती. केवळ पैशांच्या हव्यासापायी अत्यंत निर्घृणपणे घरात इतर कोणी तरूण नसल्याचा फायदा घेत आरोपींनी मुनोत दामप्त्याची हत्या केली होती. चित्रा मुनोत यांना खुर्चीला बांधून त्यांचा गळा चिरला तर रमेश मुनोत यांच्या छातीत धारदार शस्त्र खुपसून त्यांची हत्या केली होती.

घटनेदिवशी मुनोत यांची दोन्ही मुले बाहेरगावी गेलेली होती. तर विवाहित मुलगी परदेशात होती. शिवकुमार याच्याकडे दिवसाचे सुरक्षारक्षक म्हणून काम होते. पण घटनेदिवशी त्याने लवकर जायचे म्हणून बदलीवर येऊन काम करणारा सुरक्षारक्षक सुमित तिवारी याला थाप मारली व इतर सहकाऱ्यांना घराच्या परिसरात रात्री बोलावून घेतले होते. हे सचिन दळवी या साक्षीदारानेही पाहिले होते. सुमित तिवारी याला बांधून आरोपी घरात शिरले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात मृत मुनोत दाम्पत्याचे पुतणे सुनील मुनोत यांनी फिर्याद दिली. तर अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयाने ६० साक्षीदार तपासून शिवकुमारसह सहाही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपींनी खंडपीठात अपिल दाखल केले केले. तर सरकारकडून फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी अपिल दाखल केले. यामध्ये खंडपीठाने शिवकुमार याची जन्मठेपेची शिक्षा फाशीत परिवर्तीत केली. तर इतर आरोपींची जन्मठेप कायम ठेवली. यामध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शशिभूषण देशमुख यांनी युक्तिवाद केला.