बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करीत मागासवर्गीय समाजातील युवकाचा जामखेड तालुक्यात अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. सात ते आठ जणांनी या युवकाला बेदम मारहाण करीत दोरीने त्याचा गळा आवळून खून केला व नंतर त्याचे प्रेत झाडाला टांगले. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ही घटना घडली. येथील नितीन राजू आगे (१७) या युवकाचा सचिन ऊर्फ आबा हौसराव गोलेकर, शेषराव रावसाहेब येवले व काही जणांनी निर्घृण खून केला. यातील एकाच्या बहिणीशी नितीनचे प्रेमसंबंध होते, ते घरच्यांना मान्य नव्हते. याच कारणावरून त्याला जिवे मारण्यात आले. घटनेनंतर नितीनचे वडील राजू नामदेव आगे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यानुसार वरील दोघांसह सात ते आठ जणांविरुद्ध खून तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. गोलेकर व येवले यांच्यासह एका अल्पवयीन मुलास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खर्डा येथील नितीन आगे यास या आरोपींनी सोमवारी सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान कधी तरी गावातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेजवळील येवले यांच्या विटभट्टीजवळ जबर मारहाण केली. त्याचा जातिवाचक उद्धार करतानाच दोरीने गळा आवळून खून केला. तो मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथीलच एका झाडाला त्याचा मृतदेह या लोकांनी टांगला. खुनाचा पुरावा नष्ट करण्याचाच हा प्रयत्न होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील पुढील तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 30th Apr 2014 रोजी प्रकाशित
प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या
बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करीत मागासवर्गीय समाजातील युवकाचा जामखेड तालुक्यात अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला.
First published on: 30-04-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of young boy due to love affair