महाविकास आघाडी म्हणजे एक प्रकारचा लव्ह जिहादच आहे अशी टीका आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपाने कर्नाटकमध्ये जय बजरंग बलीचा नारा दिला. मात्र तो नारा चालला नाही त्यामुळे आता महाराष्ट्रात ते औरंगजेब आणि टीपू सुलतान यांच्याशी संबंधित मुद्दे उकरुन काढत आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केला. या आरोपांना केशव उपाध्येंनी जोरदार प्रत्यु्त्तर दिलं आहे.
काय म्हटलंय केशव उपाध्येंनी?
“महाविकास आघाडी हाच एक प्रकारचा लव्ह जिहाद आहे. उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना ही या लव्ह जिहादची पडलेली बळी आहे. हिंदुत्ववादी विचार सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत फरफटत जाणं यालाच तर लव्ह जिहादचा बळी म्हणतात. त्यामुळे संजय राऊत आणि शिल्लक सेनेतील इतर सर्वांना सगळीकडे हिरवं हिरवं छान वाटू लागलं आहे. अहो संजय राऊत किती अधःपतन करणार? तुम्ही ज्यांच्यासोबत बसला होतात महाविकास आघाडीत तो अबू आझमी, त्याला अजूनही औरंग्या प्रिय आहे. त्याच्याबद्दल तुम्ही ब्र काढायला तयार नाही. त्याऐवजी महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी सरकारवर टीका करत आहात. लव्ह जिहादचा बळी हाच असतो.” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.




अहमदनगरमध्ये औरंगजेबाचं पोस्टर संदलच्या मिरवणुकीत नाचवण्यात आलं. तर कोल्हापूरमध्ये औरंगजेबाचं स्टेटस काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ठेवलं होतं. या दोन्ही घटनांवरुन चांगलाच वाद पेटला. हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापुरात आंदोलनही केलं होतं. तसंच लव्ह जिहादची काही प्रकरणंही उघडकीला आल्याचा आरोप होतो आहे. या सगळ्यावरुन संजय राऊत यांनी जी टीका केली त्या टीकेला आता केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.