महाराष्ट्रात सत्तापालट होऊन ३० जूनला एक वर्ष पूर्ण होतं आहे. याच औचित्याने देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या निवडणुकांच्या दृष्टीने आपली महत्त्वाकांक्षा काय ते सांगितलं आहे. एवढंच नाही तर हा वर्षभराचा काळ आव्हानात्मक होता. मात्र जे काम करतो आहोत त्याविषयी आम्ही समाधानी आहोत. उद्धव ठाकरे सरकारने सगळ्या कामांना फक्त स्थगिती दिली होती आणि राज्याचा विकास रखडवला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांनी त्यांची महत्वाकांक्षा काय या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे चर्चेत आहे.

काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस?

“माझी महत्त्वाकांक्षा ही आहे की २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत ४२ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणं आणि माझी दुसरी महत्त्वाकांक्षा आहे की विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करायचा या दोन महत्त्वाकांक्षा आहेत. राष्ट्रीय राजकारणात जाण्याची तूर्तास तरी इच्छा नाही. मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रासाठी काम करतोय.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० जूनला वर्ष होतंय. त्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक या वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केलं आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार होता. त्यावेळी एक चर्चा सुरु झाली होती. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना जर अपात्र ठरवलं गेलं तर भाजपाचा प्लान बी तयार होता. प्लान बी असा होता की एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तर राष्ट्रवादीसह जाऊन सरकार स्थापन करायचं. त्यासाठी भाजपाची शरद पवारांशी चर्चा झाली होती अशा काही चर्चा त्यावेळी सुरु होत्या. या सगळ्या घडामोडींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीशी संपर्क करुन प्लान बी तयार होता का?

“ज्यांना सर्वोच्च न्यायालयातली प्रक्रिया समजते त्या सगळ्यांना १०० टक्के खात्री होती की सर्वोच्च न्यायलाय हे कधीही स्पीकरच्या अधिकारात येऊन कुणालाही अपात्र ठरवणार नाहीत. सर्वोच्च न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांनाच सगळे अधिकार देतील हे सर्वोच्च न्यायालयाचे आधीचे निर्णयही सांगतात. त्यामुळे त्यावेळी आम्हाला प्लान बी ची कुठलीही गरजच लागली नाही. आमची शरद पवार यांच्याशी कुठल्याही प्रकारेही चर्चा झालेली नाही. अजित पवार यांच्याशीही चर्चा झाली नव्हती. त्यांच्याशी चर्चा करुन काही फायदाही नाही कारण सर्वेसर्वा शरद पवार आहेत. त्यावेळी अशा काही अफवा तयार झाल्या होत्या. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.”