अखेर पिचडना पाझर फुटला!

नगर जिल्ह्य़ातील खर्डा (तालुका जामखेड) येथे नितीन राजू आगे या दलित युवकाच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घातल्यानंतर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांना पीडित कुटुंबाविषयी पाझर फुटला.

नगर जिल्ह्य़ातील खर्डा (तालुका जामखेड) येथे नितीन राजू आगे या दलित युवकाच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी लक्ष घातल्यानंतर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड यांना पीडित कुटुंबाविषयी पाझर फुटला. घटनेनंतर तब्बल पाच दिवसांनी त्यांनी शनिवारी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करतानाच या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदतही जाहीर केली.
प्रेमप्रकरणाच्या संशयावरून नितीन आगेची हत्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, महाराष्ट्र दिनी जिल्ह्यात असतानाही पिचड यांनी आगे कुटुंबियांची भेट घेण्यास नकार दिला होता. यासाठी त्यांनी आचारसंहितेचे कारण पुढे केले होते. मात्र, या प्रकरणावरून राज्यभरातून पडसाद उमटल्यानंतर पिचड यांचे डोळे उघडले व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ताफा घेऊन ते आगे कुटुंबियांच्या घरी थडकले. पीडित आगे कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर करतानाच नितीनच्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करील, असेही त्यांनी जाहीर केले.
‘लांच्छनास्पद घटना’
पुणे : जात आणि धर्माच्या आधारावर कोणाची हत्या होणे हे माणुसकीला लांच्छनास्पद आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी नितीन आगेच्या हत्येचा निषेध केला. माणसामध्ये भेद करणाऱ्या या गोष्टीचे मूळ नष्ट व्हायला पाहिजे. कोणत्याही अर्जावर जात, धर्म असता कामा नये. धर्म घरामध्ये असावा. पण, एकदा घराबाहेर पडले की राष्ट्रालाच प्राधान्य असले पाहिजे, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nagar guardian minister madhukar pichad visits victims relative