अहिल्यानगर: पालकांनी मुलांना चांगला कलाकार होण्यासाठी त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना जे आवडते ते मनापासून, अस्सल व दर्जेदार करण्यास पाठिंबा द्यावा. त्यांच्यातील कलांच मुलांना व्यावसायिक जीवन व उज्ज्वल भविष्य देईल, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी केले.

येथील बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशन आयोजित स्व. सेठ श्यामसुंदर बिहाणी स्मृती कथाकथन स्पर्धा व स्व. मनीष कुलकर्णी स्मृती सुगम संगीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण विभावरी देशपांडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष अभिनेते मिलिंद शिंदे, राघवेंद्र बिहाणी, कामोद खराडे, तसेच परीक्षक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सदस्य स्व. मनीष कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नगरच्या समर्थ विद्यामंदिर शाळेने सांघिक विजेतेपद मिळवले.

राघवेंद्र बिहाणी यांनी २२ वर्षांपासून बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनच्या एकत्रित प्रयत्नांतून स्पर्धा यशस्वी होत असल्याचे कौतुक केले. अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले, ‘सांस्कृतिक क्षेत्रात नवी वाट कोरत कलाकार घडविण्याचे काम, शहराचे सांस्कृतिक आरोग्य चांगले राहण्यासाठी संस्था योगदान देत आहे.’ अमित काळे यांनी प्रास्ताविक, तर राधिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनाथ केसकर, संतोष बडे, प्रा. ज्ञानेश कुलकर्णी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. अभिजित क्षीरसागर यांनी निकालपत्राचे वाचन केले. संस्थेचे विक्रांत मनवेलीकर, गौरव मिरीकर, सागर जोशी, दादासाहेब बेरड, अमोल दाते, योगेश कुलकर्णी, सागर जोशी, मनीष घोलप, प्राची कुलकर्णी, शिल्पा देशपांडे, उपेंद्र कुलकर्णी, मंगेश देवचके आदींनी स्पर्धेचे नियोजन केले.

कथाकथन स्पर्धा

लहान गट: प्रथम विभागून स्वरा समारंजक (समर्थ शाळा) व आकृती असनीकर (समर्थ शाळा), द्वितीय विभागून नीलम साठ्ये (रणाविकार विद्यालय) व सांची शाह (अशोकभाऊ फिरोदिया स्कूल), तृतीय विभागून स्वरा आकडकर (समर्थ शाळा) व अभिज्ञा जोशी (ज्ञानसंपदा स्कूल). मोठा गट- प्रथम राजश्री भणगे (गॅलेक्सी स्कूल), द्वितीय विभागून अदिती बोरुडे (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल) व अनन्या तुंगार (रेणावीकर विद्यालय), तृतीय विभागून ज्ञानेश्वरी जाधव व संतोषी भिसे (सावित्रीबाई फुले विद्या विद्यालय, राहुरी).

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुगम संगीत स्पर्धा

प्रथम विभागून कौशिक नातू (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल) व मुलांशू परदेशी (भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल), द्वितीय विभागून शौनक कुलकर्णी (विवेकानंद स्कूल) व तन्वी भावसार (आयकॉन पब्लिक स्कूल), तृतीय विभागून सिद्धी बडगुजर (आयकॉन पब्लिक स्कूल) व गौरी ढवण (रेणावीकर हायस्कूल). सांघिक विजेतेपद समर्थ विद्या मंदिर (सावेडी).