१२० टन संत्र्यांचे पाच कंटेनर समुद्रमार्गे रवाना होणार
उत्तमोत्तम खाद्य पदार्थाबाबत आग्रही व अत्यंत चोखंदळ समजल्या जाणाऱ्या दुबईने नागपुरी संत्र्याला पसंती दर्शविली असून प्रथमच ही संत्री दुबईच्या बाजारात दाखल होणार आहेत. चवीने ‘युनिक’ समजल्या जाणारी नागपुरी संत्री आजवर बांगला देश व श्रीलंकेतच निर्यात होत होती. फळांची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दुबईत मात्र शिरकाव झालेला नव्हता. गतवर्षी संत्री उत्पादक संघटनेने चव चाखण्यासाठी ही संत्री दुबईत पाठवली होती. त्याला पसंती मिळाली. पाठोपाठ ‘बुकिंग’ही लाभले. लवकरच १२० टन संत्र्यांचे पाच कंटेनर समुद्रमार्गे रवाना होतील.
संत्री उत्पादकांना आर्थिक लाभ व्हावा म्हणून संत्र्यांना देशाबाहेरील बाजारपेठ लाभणे आवश्यक होते. बांगला देशला संत्री निर्यात होत होतीच. गतवर्षी चार हजार टन संत्री तिकडे पोहोचली. तिथे या संत्र्याला मागणी असल्याने होणाऱ्या निर्यातीमुळे भारतात संत्र्याला चांगला भाव कायम राहण्यास मदत मिळे. त्यापूर्वी ही संत्री भारतात कमी भावाने विकल्या जात होती. विदेशी बाजारपेठ लाभल्याने गत काही वर्षांपासून संत्र्याचा बहर शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरू लागला. देशात ३० ते ३५ हजार रुपये टनाने विकली जाणारी संत्री विदेशात ४५ ते ५० हजार रुपये टनाने खपतात. त्याचेच पुढचे पाऊल दुबईची बाजारपेठ पादाक्रांत करण्याकडे पडले आहे.
पंजाबची संत्री यापूर्वीच दुबईत दाखल झाली. ती टिकावू पण दिखावू असतात, आकाराने व रंगाने मोहक दिसतात. पण चवीच्या बाबतीत नागपुरी संत्र्याची ती बरोबरी करीत नाही, असा संत्रा उत्पादकांचा दावा असतो. आता नागपुरी संत्र्याची चव दुबईकरांच्या जिभेवर रेंगाळणार आहे.
यावर्षी मृगबहार चांगलाच रसरसला आहे. अकाली पाऊस संत्र्यांचा आकार वाढविण्यास पूरक ठरतो. यावर्षी तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे आकारात वाढ होण्यास विलंब लागत आहे.
नागपुरी संत्री प्रथमच दुबईत निर्यात होत आहे. चवीमुळेच संत्र्यांची दखल घेतल्या गेली. समुद्रामार्गेच निर्यात स्वस्त पडत असल्याने दुबईत ती याच मार्गे रवाना होतील. पुढे युरोपीय बाजारपेठेत दाखल होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागपुरी संत्र्याच्या इतिहासात एक नवे पर्व यामुळे सुरू होईल.
– श्रीधर ठाकरे, संत्री उत्पादक संघटनेचे नेते.