सर्वपक्षीय युतीविरोधात मेटेंचे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पॅनेल

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना शेवटच्या काळात बन्सीधर सिरसाट यांनीही त्रास दिला. २७ वर्षांपासून सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून सिरसाट यांनी मजूर सहकारी संस्था ताब्यात ठेवली.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना शेवटच्या काळात बन्सीधर सिरसाट यांनीही त्रास दिला. २७ वर्षांपासून सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र करून सिरसाट यांनी मजूर सहकारी संस्था ताब्यात ठेवली. या वेळी राजकीय विळ्या-भोपळ्याची मोट बांधून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. मात्र, संस्थेत आपण गोपीनाथ मुंडे मजूर फेडरेशन परिवर्तन पॅनेल उभे केल्याने परिवर्तन होणार असल्याचा दावा आमदार विनायक मेटे यांनी केला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष घालावे इतकी मोठी निवडणूक नसल्याने त्या कोणत्याच पॅनेलबरोबर नसल्याचेही मेटे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा मजूर सहकारी संस्थेची निवडणूक २८ जून रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित येऊन संस्थेचे अध्यक्ष बन्सीधर सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. ३ जागा बिनविरोध निघाल्या. मात्र, आमदार मेटे यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केल्यामुळे बिनविरोध निवडणुकीचे मनसुबे उधळले गेले. या पाश्र्वभूमीवर रविवारी आमदार मेटे यांनी पत्रकार बठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. मेटे म्हणाले की, मागील २७ वर्षांपासून बन्सीधर सिरसाट यांनी सर्व राजकीय नेत्यांना एकत्र करून संस्था ताब्यात ठेवून आपले साम्राज्य उभे केले. दिवंगत मुंडे यांच्या शेवटच्या काळात सिरसाट यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मुंडेंना मोठा त्रास दिला. त्यामुळे मुंडेंना त्रास देणाऱ्यांविरुद्ध आपण निवडणुकीच्या मदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या वेळीही राजकीय विळ्या-भोपळ्यांना एकत्रित करून सिरसाट यांनी निवडणूक अविरोध काढण्याचा प्रयत्न केला होता, पण काही सुजाण मतदार व कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांश नेते आपल्याबरोबर असून संस्थेत परिवर्तन करण्यासाठी गोपीनाथ मुंडे मजूर फेडरेशन परिवर्तन पॅनेल उभे करण्यात आले. सिरसाट यांनी सर्वपक्षीय नेत्यांना काही जागा देऊन धनशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करीत असले, तरी या वेळी मतदार ‘चमत्कार’ करतील आणि गोपीनाथ मुंडे यांना त्रास देणाऱ्यांना घरी बसवतील, असा दावा आमदार मेटे यांनी केला.
राज्य सरकारने मजूर संस्थांना गुत्त्याची कामे देताना तीन लाख रुपयांची मर्यादा घालून दिली. या बाबत सरकारकडे पाठपुरावा करून मजूर संस्थांना १५ लाखांपर्यंतची कामे मिळावीत, यासाठी प्रयत्न करणार आहे. कार्यालय संगणकीकरण करून सभासदांसाठी पतसंस्था स्थापन करू,अशी ग्वाही त्यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने मजूर फेडरेशनमध्ये पॅनल उभे केले असल्याने पालकमंत्री पंकजा मुंडे पॅनेलबरोबर आहेत का, या प्रश्नावर मेटे म्हणाले की, पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे इतकी मोठी ही संस्था नाही. त्या कोणत्याही पॅनेलबरोबर नसल्याचा दावा त्यांनी केला. शिवसंग्राम युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, शिवाजी जाधव, शिवाजी कवठेकर आदींसह पॅनेलमधील १३ उमेदवार उपस्थित होते.
‘..तर जिल्हा बँकेला टाळे ठोकणार’
पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेत पीकविम्याचे २५१ कोटी आले आहेत. मात्र, बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा हे पीकविम्याचे पसे शेतकऱ्यांना देण्याऐवजी कर्जकपात करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा हक्काचा पसा कोणतीही कपात न करता तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी आपण केली. मात्र, बँकेने पसे कपात करण्याचा प्रयत्न केल्यास बँक कोणाची आहे, सरकार कोणाचे आहे याचा कसलाही मुलाहिजा न बाळगता बँकेला टाळे ठोकू, असा इशारा आमदार मेटे यांनी दिला. मेटे यांच्या मजूर फेडरेशनमधील स्वतंत्र पॅनेल व जिल्हा बँकेबद्दलची स्पष्ट भूमिका यामुळे मेटे हे महायुतीचे घटक पक्ष असले, तरी जिल्ह्यात भाजप नेतृत्वाबरोबर राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Name of gopinath mundes panel of vinayak mete against all party alliance