राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलत असताना त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही 12 आमदारांच्या नियुक्तीत टाळाटाळ करत असल्याचा आरोपही केला.

पटोले म्हणाले, भाजपा सध्या फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट थांबवण्यासाठी राज्यपालांचा वापर सुरू आहे. अनेकदा म्हटलेलं आहे, विधानसभेतही म्हटलं आहे की राज्यपाल भवन आता भाजपा कार्यालय झालं आहे. मागच्या काळात भाजपाने मोठ्या प्रमाणात नेत्यांना आयात करुन ठेवलं आहे. भाजपाचे काही आमदार आहेत, त्यांनाही वाटतंय की आता आपण काय मंत्री होणार नाही. त्यामुळे तेही फुटणार आहेत. आणि जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून भाजपाकडून सातत्याने हे वक्तव्य करण्यात येतं की, आठ दिवसांत आम्ही मंत्रिमंडळ बदलू, सत्तेत येऊ. पण हे करता करता आता दोन वर्षे पूर्ण होत आली. आणि आता भाजपामध्ये खूप चलबिचल सुरू झाली आहे. भाजपाचे अनेक नेते, आमदार माझ्या संपर्कात आहेत. दुसऱ्याही पक्षाचे असतील.  म्हणून हे बारा आमदार ज्यादिवशी या महाविकास आघाडीचे होतील, त्या दिवशी पक्ष फुटेल याची भीती त्यांच्या मनात आहे.

त्यामुळे राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती टाळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. आणि स्वतःचं पक्ष वाचवण्यासाठी भाजपा अनेकांवर अन्याय करत आहे असं विधानही त्यांनी केलं आहे.