महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याबाबत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्यातील शिक्षक भरती घोटाळा मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्याप्रमाणे आहे,” असं नाना पटोले म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. ते गुरुवार (२५ ऑगस्ट) विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिक्षक भरती घोटाळा ‘व्यापम’सारखाच

नाना पटोले म्हणाले, “राज्यातील शिक्षक भरती घोटाळ्याचे मूळ तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात आहे. फडणवीस सरकारने TET साठी आणलेली खासगी यंत्रणाच भ्रष्टाचाराच्या गाळात अडकलेली होती. त्यावेळी झालेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या नोकर भरतीत गडबड घोटाला झाला होता. खासगी कंपनीमार्फत ही नोकरी भरती प्रक्रिया राबवली गेल्याने परीक्षा केंद्रापासून, पास करण्यापर्यंत घोटाळा झाला आहे.”

“गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय”

“TET च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून भरती व्हावी व दर्जेदार शिक्षण रहावे हा त्यामागचा हेतू होता. मात्र, ही प्रकीया खासगी यंत्रणेच्या माध्यमातून राबवली. त्यात गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचे दिसत आहे. राज्यात २०१४ ते १९ या काळात झालेली नोकरी भरती ही मध्य प्रदेशातील भाजपाच्या शिवराजसिंह चौहान सरकारच्या काळातील ‘व्यापम’ घोटाळ्यासारखीच आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करून न्याय द्यावा,” असेही पटोले म्हणाले.

“हे सरकार मस्तीत वागत असल्याचे दिसले”

“राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. परंतु शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही. शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही,” असा घणाघाती हल्लाही नाना पटोलेंनी केला.

पाहा व्हिडीओ –

“राज्यातील ईडी सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर नाही”

नाना पटोले पुढे म्हणाले, “आम्ही विधिमंडळात शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले पण शिंदे-फडणवीस सरकार या विषयावर चर्चा करण्यासही तयार नाही. शेतकरी, कामगार, बेरोजगारांसह सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष नाही. राज्यातील ईडी सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर दिसत नाही. विधीमंडळात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून हे सरकार मस्तीत वागत असल्याचे दिसले.”

हेही वाचा : “…पण सरकार आपल्याच मस्तीत” मंत्रालयासमोर शेतकऱ्याने पेटवून घेतल्यानंतर नाना पटोलेंची टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा”

“शेतकऱ्यांना भक्कम आधार देण्यात हे सरकार टाळाटाळ करत आहे. शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी बागायती जमीन व फळबागेसाठी हेक्टरी १.५ लाख रुपये, तर जिरायतीसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत, असा ठराव काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत केला आहे,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.