नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनापूर्वीच शिवसेनेला (उद्धव ठाकरे सेना) मोठे खिंडार पडले आहे. जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे बंधन हाती बांधणार असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राज्यातील सत्तांतरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसेनेला पहिला धक्का दिला होता. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी ‘मातोश्री’ची साथ सोडत शिंदे गटात सहभागी होऊन उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का दिला होता. आमदार कल्याणकर, खासदार पाटील यांच्या ‘शिंदेशाही’तील सहभागाला नांदेडमधील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध दर्शविला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोमवारच्या दौऱ्यात नांदेड उत्तर मतदारसंघातील कोटय़वधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार असून शहरात एक मोठा मेळावाही खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून पार पडत आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याची धामधूम सुरू असतानाच नांदेडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नांदेड उत्तर भागातील ‘सरकार’ अशी ओळख असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी उद्धव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला असून ते सोमवारी शिंदे सेनेत सहभागी होणार आहेत. त्यांच्यासमवेत शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले (मालेगावकर), अर्धापूरचे तालुकाप्रमुख संतोष कपाटे, मुदखेडचे तालुकाप्रमुख संजय कुर्हे, धर्माबादचे तालुकाप्रमुख आकाशरेड्डी येताळकर, भोकरचे तालुकाप्रमुख अमोल पवार, माजी तालुकाप्रमुख जयवंत कदम आदी प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

उमेश मुंडे यांच्याकडे मुखेड, नायगाव, देगलूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेने सोपविली होती. मुंडे हे शिंदेसेनेत दाखल होत असल्यामुळे या तीनही मतदारसंघांतील बहुतांश पदाधिकारी त्यांच्यासमवेत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भोकर, अर्धापूर, मुदखेड तालुक्यातील शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आहे, शिवसेनेच्या गडाला हा मोठा हादरा मानला जात असून मुंडे यांच्या पाठोपाठ आणखी कोणते शिलेदार ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी उमेश मुंडे यांनी खासदार हेमंत पाटील यांची सदिच्छा भेट घेत, आपला निर्णय जाहीर केला. या वेळी त्यांच्यासमवेत प्रल्हाद इंगोले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मुंडे यांचे खासदार पाटील यांच्यासमवेतचे छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये झळकताच शिवसेनेत एकच खळबळ उडाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.