नंदुरबारमधील ठाणेपाडाजवळ एसटी बस आणि जीपच्या धडकेत ४१ प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. जखमींपैकी पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे- नंदूरबार ही बस सोमवारी संध्याकाळी साक्री-नंदुरबार रस्त्यावर ठाणेपाडा येथून जात होती. या दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रवासी जीपला बसने धडक दिली. या भीषण अपघातात ४१ प्रवासी जखमी झाले. यात बसमधील ३२ प्रवासी  आणि जीपमधील ९ प्रवाशांचा समावेश आहे. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

ठाणेपाडा येथील ग्रामस्थांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जखमींसाठी मदतकार्य राबवले. अपघातातील जखमींना नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पुढे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिका कमी पडल्याने जखमींना रुग्णालयात नेताना अडचणीचा सामना करावा लागला. अपघातानंतर बसचालक पोलिसांसमोर हजर झाला आहे.