तब्बल दोन आमदार आणि एका खासदाराची राजकीय शक्ती पणाला लावूनदेखील नंदुरबारमधील काँग्रेसच्या गडाला हादरा देण्यात भाजपला अपयश आले. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावलांसारख्या बडय़ा नेत्यांच्या सभा होऊन देखील नंदुरबार आणि नवापूर पालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे सीमावर्ती भागात काँग्रेसला अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. त्यातच नंदुरबार पालिकेत काँग्रेसला शिवसेनेच्या मिळालेल्या साथीने नव्या समीकरणांची नांदी झाली आहे.
कधी काळी काँग्रेसचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्य़ात लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसला मात देत भाजपने या जिल्ह्य़ात जोरदार मुसंडी मारली होती. त्यानंतर झालेल्या शहादा पालिकेच्या निवडणुकांसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्याने नंदुरबार, नवापूर आणि तळोदा पालिकेत सत्ता परिवर्तनाचे मनसुबे भाजपच्या नेत्यांनी आखले होते. मात्र जिल्ह्य़ातील पालिका निवडणुकांनंतर तळोदा पालिका वगळता भाजपला सत्ता हस्तगत करण्यात अपयश आले. शहरी मतदारांनी भाजपला नाकारल्याचे दिसून येते. सर्वाधिक चुरशीच्या ठरलेल्या नंदुरबार नगरपालिकेत भाजपच्या दोन आमदार आणि खासदारांनी राजकीय ताकद पणाला लावली होती. याशिवाय ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असा मोठा फौजफाटा असतानादेखील काँग्रेसचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या ताब्यातील नंदुरबार नगरपालिकेत परिवर्तन करण्यात हा फौजफाटा कमी पडला आहे. या साऱ्या भाजप नेत्यांनी आरोपांचे रान करून प्रचाराची धुरळ उडवली असताना त्यास आमदार रघुवंशी पुरून उरले.
या पालिकेत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत परिवर्तनाची हाक दिली होती. मात्र नंदुरबारमध्ये पाच वर्षांत झालेल्या विकासकामांनी काँग्रेसला तारून नेले. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसची तोफ समजल्या जाणाऱ्या रघुवंशींना मात देण्यासाठीच भाजपने आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आणून मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र नंदुरबारमधील भाजपचे नेते काँग्रेसचा गड सर करण्यात अपयशी ठरले. विशेष म्हणजे, या पालिकेत काँग्रेससोबत युती करणाऱ्या शिवसेनेसह पाचपैकी चार जागांवर यश संपादित केले आहे. शिवसेनेने युवकांची मते काँग्रेसच्या पारडय़ात आणण्यात यश मिळवले. सेना-काँग्रेसची पालिकेतील युती आगामी काळात राज्यातील एका वेगळ्या घडामोडीची नांदी ठरणार असल्याचे संकेतदेखील सेनेसह काँग्रेसच्या नेत्यांकडून दिले गेल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपची नंदुरबारपेक्षा दयनीय अवस्था नवापूर पालिकेत झाली. या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पालिकेत एकही नगरसेवक निवडून न आल्याने भाजपची पुरती नाचक्की झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावासाहेब दानवे यांची नवापूरमधील सभा विशेष गाजली होती. या दोन्ही पालिकांची जबाबदारी ही पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी आणि भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्याकडे होती. गुजरातला लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्य़ात मोदी लाट कायम असताना या दोन्ही पालिकांतील अपयशानंतर या सर्व नेत्यांना चिंतन करावे लागणार आहे.
तळोदा पालिकेत परिवर्तन
जिल्ह्य़ात भाजपला या पराभवाला सामोरे जावे लागत असतांना दुसरीकडे तळोदा शहादा मतदारसंघाचे भाजप आमदार उदेसिंग पाडवी यांनी मात्र आपल्या प्रभावात तळोदा पालिकेत सत्ता परिवर्तन करून दाखवले आहे. या ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांसह ११ भाजप नगरसेवक निवडून आल्याने भाजपचे जिल्ह्य़ात अस्तित्व टिकवण्याचे काम पाडवींनी करून दाखवले आहे. आगामी वर्षभरावर जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांच्या निवडणुका येऊ घातल्या असल्याने काँग्रेसचे मनोबल उंचावले असून भाजपच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.