मालवणात सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर मासेफेक केल्याप्रकरणी मंगळवारी पोलिसांकडून नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने सात हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. यावेळी नितीश राणे यांच्यासह २४ जणांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. आज सकाळपासून न्यायालय नितेश राणेंसंदर्भात काय निकाल देणार, याकडे सगळयांचे लक्ष लागले होते.
काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी परप्रांतीय मच्छिमारांच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन त्यांना परप्रांतीय मच्छीमार बंदीच्या काळातही मासेमारी कसे करतात, याचा जाब विचारला होता. यावेळी त्यांनी आयुक्तांसमोरील टेबलावर मासे फेकले. चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांच्या प्रतिप्रश्नाने संतप्त झालेल्या नितेश राणेंनी आयुक्तांना थेट मासा फेकून मारला होता. त्यानंतर सहाय्यक मत्स्य आयुक्त वन्स यांनी राणे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परप्रांतीय लोकांना मच्छीमारी करण्यास देत असल्याने आमदार नितेश राणे सिंधुदुर्गातील मत्स्य विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी आक्रमक होत मच्छीमारी बंदी आहे तर हे मासे कोठून आले, असा प्रश्न त्यांनी सहाय्यक आयुक्तांना विचारला होता. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त वन्स यांनी उद्धट उत्तरे दिली, असं सांगितलं जातं. वन्स यांच्या उत्तरावर आमदार राणे संतापले. त्यांनी त्यांच्या अंगावर मासे फेकले होते.
उद्धव ठाकरेंचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवा!; नितेश राणेंचा अर्ज
दरम्यान, याप्रकरणी नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या कृतीचे समर्थन केले होते. माझ्या मुलाने घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता. पारंपरिक मच्छीमारांच्या आंदोलनाला त्याने पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी म्हटले होते. रंपरिक मच्छीमारांना न्याय मिळवून देणासाठी आंदोलन होते. आंदोलनात एकापेक्षा अनेक जण एकत्र आल्यावर आंदोलनाचे स्वरूप बदलते. त्यामुळे त्याने बांगडा मारल्याचे नव्हे तर अन्यायाविरोधात आंदोलनाचे नेतृत्व केल्याचे समर्थन करतो, असे नारायण राणे म्हणाले. गोवा राज्यातील पर्ससीन मच्छीमार मासे बंदी कालावधीत येऊन मच्छीमारी करत आहेत. त्यासाठी महिनाकाठी २५ ते ३० लाखांचा हप्ता दिला जात आहे. या भ्रष्टाचाराविरोधात पारंपरिक मच्छीमार नितेश यांच्या नेतृत्त्वाखाली एकवटल्याचे नारायण राणे यांनी सांगितले होते.