|| हर्षद कशाळकर

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणूकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना पाठींबा जाहिर केला. नारायण राणे यांच्या या भुमिकेमुळे शिवसेनेच्या राजीव साबळे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने सेना आणि राष्ट्रवादीत चुरशीची लढत पहायला मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मतदार संघात एकुण ९४० मते आहेत. यात शिवसेनेची २९३, भाजपाची १६४, राष्ट्रवादी काँग्रेसची १७४, काँग्रेसची ६९, शेकापची ९२, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ९८, मनसेची १२, अपक्ष ३, आरपीआय २४ तर ग्राम विकास आघाडीच्या ११ मतांचा समावेष आहे. जिल्हा निहाय मतांची वर्गीकरण केले तर स्थानिक स्वराज्य संस्थांची रायगड ४६९, रत्नागिरी जिल्ह्यत २५९ आणि सिंधुदूर्गात २१२ मते आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसला, काँग्रेस, शेकाप, मनसे यांनी यापुर्वीच पाठिंबा जाहिर केला होता. यात आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची भर पडली. नारायण राणे यांच्या या भुमिकेमुळे शिवसेनेची कोंडी झाली. स्वाभिमान पक्षाची सिंधुदूर्ग जिल्ह्यत ९८ मते आहेत. जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरेंसाठी निर्णायक ठरू शकतात. या सर्व पक्षांच्या मतांची बेरीज केली तर ती ४४५ होते. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती ४५७ एवढी होत आहे. अशावेळी अपक्ष, आरपीआय आणि ग्रामविकास आघाडीची ३८ मत ज्याला मिळतील तो उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला एनडीएत सहभागी करून भाजपाने राज्यसभेची खासदारकी बहाल केली. पण राज्यसरकारमध्ये स्वाभिमान पक्षाला सहभागी करुन घेण्यास शिवसेनेन कडवा विरोध केला होता.

हिबाब लक्षात घेऊन कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शिवसेनेची कोंडी करण्याचे धोरण नारायण राणे यांनी अवलंबिले आहे. पालघर आणि सांगलीतील पोटनिवडणुकीत शिवसेनेने घेतलेली भुमिका लक्षात घेऊन भाजपनेही राणे यांच्या भुमिकेकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

कोकणात शिवसेनेचा वाढता प्रभाव यामुळे आपणहूनच रोखला जाऊ शकणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थासाठी मागील निवडणुक २०१२ मध्ये झाली होती.

यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल तटकरे आणि शिवसेनेच्या उमेश शेटय़े यांच्यात थेट लढत झाली होती. या निवडणूकीत अनिल तटकरे यांनी उमेश शेटय़े यांचा २६१ मतांनी पराभव केला होता. मात्र गेल्या पाच वर्षांत कोकणात राष्ट्रवादीची ताकद मोठय़ा प्रमाणात घटली.

तर दुसरीकडे शिवसेनेची ताकद वाढली होती. यामुळे शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, पण शेकाप, काँग्रेस, मनसे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची साथ लाभल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळाले आहे. तर स्वबळाचा हेका धरून बसलेल्या सेनेला आयत्या वेळी भाजपची साथ मिळाली नाही तर शिवसेनेचा पराभव अटळ आहे.

जिल्हानिहाय मतांची संख्या

  • मतदारसंघातील एकुण मते- ९४१
  • रायगड- ४६९
  • रत्नागिरी – २५९
  • सिंधुदूर्ग- २१२
  • रिक्त- १