सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात रखरखत्या उन्हात रस्त्यावरील पाणपोईवर तहानेने व्याकूळ झालेली एक गाय उभी आहे. यावेळी तिथून एक व्यक्ती येते आणि ती गाईला ज्याप्रकारे मदत करते ते पाहून अनेकांनी, या जगात खरंच माणुसकी अजून शिल्लक आहे, असे म्हटलेय.
राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. अशा स्थितीत लोकांना सकाळी ११ वाजल्यापासून उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यात दुपारच्या वेळी घराबाहेर पडणंही नकोस झालयं. माणसांनाच इतका त्रास होतोय, तर जनावरांना किती होत असेल विचार करा. तीव्र उष्णतेमुळे वारंवार तहान लागतेय. माणूस असो वा प्राणी, प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पण, माणूस कुठूनही, कोणाकडूनही पाणी मागून पिऊ शकतो. पण, मुक्या प्राणांना अडचणी येतात.
व्हायरल व्हिडीओत असेच काहीसे पाहायला मिळत आहे. तहानलेली एक गाय रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणपोईवर पाणी पिण्याचा प्रयत्न करत असते. पण, तिला नळ उघडता येत नसल्याने पाणी पिण्यास अडचण होते. पाण्यासाठी गाईची सुरू असलेली धडपड पाहून रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती तिथे येते आणि गायीचे पाणी पिऊन पोट भरत नाही तोपर्यंत नळ दाबून आपल्या हाताच्या ओंजळीने तिला पाणी भरवते.
सध्याच्या जगात माणुसकी हरवली जात असल्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. संकटाच्या वेळी माणसाला मदत करावी, वेळ पडली तर आपण दोन घास कमी खावे, पण भुकेलेल्याला एक घास तरी द्यावाच, असे अनेकांना लहानपणापासून शिकवले जाते. पण, आपण किती जण हे फॉलो करतो असा प्रश्न आहे. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये व्यक्तीने जे काही केले ती खरी माणुसकी आहे, असे म्हणायला हरकत नाही.
हा भावनिक व्हिडीओ एक्सवर@madhu_quen नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, “माणुसकी अजूनही जिवंत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “खूप सुंदर.” आणखी एका युजरने लिहिले की, “प्रत्येकाला मदत करत राहा, कुणास ठाऊक, कोणत्या गरीब आणि असहाय व्यक्तीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि तुमचे जीवन स्वर्ग बनून जाईल.”