देशात कुठेही मोदींची लाट नाही- आदिक

महाराष्ट्रासह देशात कुठेही नरेंद्र मोदींची लाट नाही असा दावा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकहिताच्या निर्णयामुळे केंद्रात यूपीएचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रासह देशात कुठेही नरेंद्र मोदींची लाट नाही असा दावा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस गोविंदराव आदिक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकहिताच्या निर्णयामुळे केंद्रात यूपीएचेच सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांत मागच्या पाच वर्षांतच देशात सर्वाधिक निर्णय झाले असा दावा आदिक यांनी केला. ते म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत. काँग्रेसचा काही राज्यांत झालेला पराभव हा त्या ठिकाणच्या स्थानिक कारणांचा परिपाक आहे. लोकसभेच्या निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नाही. लोकसभेच्यी निवडणूक राष्ट्रीय मुद्यांवर होते. देशपातळीवरील प्रश्नांभोवतीच ही निवडणूक केंद्रित असून त्याच्याच जोरावर यूपीए स्पष्ट बहुमत मिळवील. महागाई किंवा मंदी हा काही केवळ भारतापुरता मर्यादित विषय नाही. अमेरिकेसारख्या बलाढय़ देशासह संपूर्ण जग सध्या याच परिस्थितीचा सामना करीत आहे. सर्वसामान्यांना या गोष्टींची त्यातल्या त्यात कमी झळ बसेल अशी काळजी केंद्र सरकारने प्रभावीपणे घेतली असून ही यूपीएची मोठीच जमेची बाब आहे. मागच्या दहा वर्षांत अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी देशात पुन्हा यूपीएचीच गरज आहे असे आदिक म्हणाले.
देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्रात गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिला. या गारपिटीने शेतकऱ्यांचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे. अशाही स्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताची पावले उचलली. पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडण्यास सुरुवातही झाली आहे. याबाबत पुढचे धोरण ठरवण्यासाठी उद्याच (गुरुवार) राष्ट्रवादी किसान सभेची बैठक नगरला आयोजित करण्यात आली आहे. बैठकीतील निर्णयानुसार मुख्यमंत्री व केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन देऊ असे आदिक म्हणाले. राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे, आमदार अरुण जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, काँग्रेसचे विनायक देशमुख, डी. एम. कांबळे आदी या वेळी उपस्थित होते.   
दोन्ही जागा जिंकू!
नगर जिल्हा हा पुरोगामी विचारांचाच आहे. मागच्या काळात काही चुकांमुळे येथे भाजप-शिवसेनेला यश मिळाले, मात्र आता तसे होणार नाही. जिल्हय़ातील दोन्ही जागा काँग्रेस आघाडी पुन्हा खेचून आणील असा विश्वास आदिक यांनी व्यक्त केला. नगर लोकसभा मतदारसंघातून राजीव राजळे यांना सर्वाच्या संमतीनेच उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हय़ाच्या नेतृत्वात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची कुवत त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच त्यांचा विजय निश्चित आहे असा दावाही त्यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Narendra modi wave is not anywhere in the country adik