कैद्यांकडील आक्षेपार्ह वस्तू जप्त
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून भ्रमणध्वनीद्वारे मुंबईच्या नगरसेवकाला खंडणीसाठी धमकावल्याचे प्रकरण उघडकीस आल्याच्या पाश्र्वभूमीवर तुरुंग महानिरीक्षक कार्यालयातील दक्षता पथकाने रविवारी मध्यरात्री येथील कारागृहात अचानक भेट देऊन झडतीसत्र राबविले. त्यात कैद्यांकडे अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्याचे सांगितले जाते. या तपासणीमुळे संतप्त झालेल्या काही कैद्यांनी जेवणावर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असून या घटनाक्रमाबद्दल कारागृह प्रशासनाने मौन बाळगले आहे.
मुंबईतील नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक ब्रायन मिरांडा यांना खंडणीसाठी कारागृहातील सचिन खांबे व सचिन शेट्टी या कैद्यांनी भ्रमणध्वनीद्वारे धमकाविल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने गुन्हा दाखल केला. या पथकाने चार दिवसांपूर्वी संशयितांना कारागृहातून अटकही केली. वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या नाशिक रोड कारागृहात कैद्यांना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या सोईसुविधांवर यानिमित्ताने प्रकाश पडला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत कारागृह महानिरीक्षक कार्यालयातील दक्षता पथकाने रविवारी मध्यरात्री अचानक नाशिक रोड कारागृहात धडक दिली. रात्रीच्या वेळी कैदी गाढ झोपेत असताना कारागृहाची तपासणी सुरू केली. सोमवारी दुपारी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. या तपासणीत अनेक आक्षेपार्ह बाबी कैद्यांकडे मिळून आल्या. या वस्तू पथकाने ताब्यात घेतल्या. यामुळे कैद्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला. ही तपासणी व कैद्यांच्या आंदोलनाविषयी कारागृह प्रशासनाने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. दरम्यान, कारागृहातील अधिकारी व कर्मचारी लोभापायी कैद्यांना कोणत्याही सुविधा पुरविण्यास कसे तयार होतात, ही बाब काही वर्षांपूर्वी एका ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे उघड झाली होती. मुंबई पोलिसांचे पथकही कैद्यांनी कारागृहातून धमकीचे दूरध्वनी कसे दिले याची तपासणी करीत आहे.