दुसऱ्या राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवात नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा विद्यार्थी महेश काळे याने दिग्दर्शित केलेल्या ‘रुपया’ या लघुपटाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चित्रपट प्रशिक्षण देणाऱ्या भारतभरातील संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी असलेला हा एकमेव महोत्सव गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने यंदाच्या महोत्सवाचे आयोजन कोलकाता येथे सत्यजित रॉय फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये केले होते.
महेश काळे हा न्यू आर्ट्सच्या संज्ञापन अभ्यास विभागाचा विद्यार्थी आहे. विभागाने यंदाच्या महोत्सवासाठी रुपया, भंगारवाले (दिग्दर्शन-अजय थोरात) व ओढ मनाची (दिग्दर्शन-विनायक इप्पलपेल्ली) हे लघुपट पाठवले होते. महोत्सवात हे तिन्ही लघुपट दाखवण्यात आले. त्यातील ‘रुपया’ला पारितोषिक मिळाले. या लघुपटाचे चित्रीकरण खडकी (ता. नगर) या गावात करण्यात आले. त्यात यशराज कऱ्हाडे, नाना मोरे, योगेश डिंबळे, इंद्रभान कऱ्हे यांनी अभिनय केला आहे. महोत्सवात महेशला प्रख्यात दिग्दर्शक केतन मेहता यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या लघुपटाची नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही निवड झाली आहे. कॉलेजच्या याच विभागाच्या नागराज मंजुळे याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर हे दुसरे यश मिळाल्याचे व त्याचा भविष्यातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल, अशी भावना विभागप्रमुख प्रा. बापू चंदनशिवे यांनी व्यक्त केली. महेशचे संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, तसेच पदाधिकारी नंदकुमार झावरे, जे. डी. खानदेशे, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे आदींनी अभिनंदन केले.