वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणारे गोपीचंद पडळकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाने त्यांना बारामतीतून अजित पवारांविरोधात उमेदवारी दिली आहे. दरम्यान, भाजपाने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, त्यांना अजिबात मतदान करू नका, असे आवाहन करणारा गोपीचंद पडळकर यांचा व्हिडीओ राष्ट्रवादीने ट्विट केला आहे.
एके काळी राष्ट्रीय समाज पक्षात कार्यरत असलेल्या पडळकरांनी राजकीय महत्त्वाकांक्षेतून भाजपमध्ये प्रवेश करीत वक्तृत्वाच्या जोरावर तरुणाईमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या भाषणबाजीवर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘भाजपचे स्टार प्रचारक’ असा मान मिळवला; पण या बदल्यात पक्षाने त्यांना केवळ भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिले. विधान परिषदेचे सदस्यत्व मिळेल, गेला बाजार एखादे महामंडळ तर हाती लागेल असा आशावाद उराशी बाळगून त्यांनी गेल्या विधानसभेची खानापूर आटपाडीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. मात्र खासदारांचा दोस्ताना खानापुरात अडचणीचा ठरल्याने त्यांची डाळ शिजली नाही. यामुळे नाराज झालेल्या पडळकरांनी खासदारांशी उभा दावा मांडला होता. यातून भाजपवर तोंडसुख घेत विरोधकांची ताकद संघटित करीत धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी साधली आणि आपले राजकीय बस्तान बसविले.
पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते असलेले गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना परभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना पडळकर यांनी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश केला. तसेच त्यांना लागलीच बारामतीतून उमेदवारीही देण्यात आली. ते अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
पडळकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांनी भाजपाविरोधात केलेले एक भाषण व्हायरल झाले आहे. हे भाषण राष्ट्रवादीने त्यांच्या ट्विटरवरून शेअर केली आहे. “भाजपाने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही, तर त्यांना आजिबात मतदान करू नका, मी स्वत:, माझी आई, माझा भाऊ जरी निवडणुकीला उभा राहिला तरी त्यांना मतदान देऊ नका, असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाज बांधवांना केले होते. यावरून राष्ट्रवादीने पडळकरांना कोडींत पकडले आहे.