आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता. हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. आता समीर वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेतील. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे, अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 

समीर वानखेडे हे खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपाचा यामागे हात आहे, हे स्पष्ट होईल असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपाला लगावला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशात काय म्हटले आहे?

“आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. तसेच आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन,अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचे षडयंत्र रचल्याचं दिसून येत नाही”, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. 

“सर्व आरोपींनी समान हेतूने बेकायदेशीर कृत्य करण्यास सहमती दर्शविली हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावा न्यायालयासमोर सादर केला गेला नाही.” असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. “अर्जदारांविरुद्ध कट रचल्याचा खटला सिद्ध करता यावा, यासाठी पुराव्याच्या स्वरूपात मूलभूत सामग्री असली पाहिजे, याबाबत न्यायालय संवेदनशील आहे.”, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.