राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचं नाव न घेता उत्तर देत मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो असं म्हटलं आहे. अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना त्यांनी मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे असं सांगत त्यांनी इशारा दिला आहे. रोहित पवार यांच्या प्रचारानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती.

रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर भाजपा मंत्री राम शिंदे यांचं आव्हान आहे. सभेत बोलताना अजित पवार यांनी काहीजणांकडून परिसरात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, “आम्ही काय असं-तसं इथं आलं आहोत का? आम्ही काय बांगड्या घातलेल्या नाहीत. ज्या गावच्या बोरी असतात, त्याच गावच्या बाभळी असतात हे दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांनी विसरु नये”.

आणखी वाचा- रोहित पवारांच्या प्रचार रथामध्ये ‘विठ्ठल’

“आमच्या कार्यकर्त्यांना कोणी धमकावण्याचा, दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, तर मला सांगा. मग त्या दम देणाऱ्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो,” अशी ताकीद अजित पवार यांनी दिली आहे. “आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला कोणी धक्का लावला, तर त्यांच्याकडे बघून घेईन,” असंही ते म्हणाले आहेत.