तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पाच वर्षांत महाराष्ट्र ओरबाडून काढला. मी अतिशय जबाबदारीने वक्तव्य केलं आहे. मी याचे पुरावे देऊ शकतो. मी पुराव्याशिवाय, कागदपत्राशिवाय कधीच बोलत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. शिवस्मारकाच्या कामात इतका घोळ केला आहे की, उभ्या महाराष्ट्राने पायताणाने मारलं पाहिजे. शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.
“लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला”
लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे असं सांगताना फडणवीस यांच्या खोटारडेपणाला कंटाळून मी राजीनामा दिला असल्याचं अनिल गोटे यांनी यावेळी सांगितलं. आपल्या पक्ष सोडण्याचं कारण सांगताना अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळत नाहीत असा आरोप केला.
“मी त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं. पण ते सगळ्या गुंड, बदमाशांचे साथीदार आहेत हे लक्षात आलं. पक्ष सामान्य माणसांचा असतो. आता सगळी राजघराणी आमच्या पक्षात आली असं ते म्हणाले होते. राजघराण्यांसाठी पक्ष चालवता का ? शेवटचा गरीब माणूस आपल्या पक्षात राहील असं मी म्हटलं असतं. पण यांना राजघराण्याची पडली आहे,” अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे.
आणखी वाचा – पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला – अनिल गोटे
“माझ्याकडे प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी”
“मोपलवार यांच्याइतका भ्रष्ट माणूस जर देवेंद्र फडणवीस यांना चालत असेल तर काय बोलायचं ?काही सांगायची गरजच नाही. प्रत्येक गावात काय घोटाळा केला आहे याची यादी माझ्याकडे आहे,” असं सांगताना अनिल गोटे यांनी समृद्धी महामार्गातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला.