विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचा उल्लेख विधानसभेत केला. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. भाजपाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दरम्यान स्वतः अजित पवार हे दोन दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा माध्यमांसमोर आलेले नाहीत. आज सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार आले असताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर भाष्य केले. तसेच अजित पवार हे लवकरच माध्यमांसमोर येऊन बोलतील असे सुतोवाच देखील केले.

“छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा. धर्मवीर म्हणायचे असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले तर त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा. मला काळजी अशी वाटते की, मी ठाण्याला जेव्हा जातो तो धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात. राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवार यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर स्वराज्यावर हल्ले होत असताना संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे. म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही.”, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले आणि वादावर पडदा टाकावा असे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता याबद्दल जे ट्विट टाकले होते, त्याच्याबाबतही पत्रकारांकडून प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “मी आव्हाड यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. अजित पवार यांचे वक्तव्य मी टीव्हीवर पाहिले होते, म्हणून त्यावर प्रतिक्रिया देत आहे. आता कुणी आमदार बोलत असतील त्या प्रत्येकावर मी प्रतिक्रिया देणे योग्य नाही.”