विधानसभा निवडणुकांपूर्वी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. नुकतेच सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाची साथ सोडून हाती शिवबंधन बांधून घेतले. त्यानंतर आता राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपला राजीनामा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. तसेच शुक्रवारी कालिदास कोळंबकर, चित्रा वाघ आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या बैठकीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या भाजपात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले होते. शुक्रवारी रात्री त्यांनी आपल्या पदाचा आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवला. दरम्यान, आपण आपल्या पदाचा राजीनामा सोपवत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच महिलांचा आवाज बनण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचेदेखील आभार मानले आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकापाठोपाठ एक बडे नेते काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसमधून बाहेर पडत असल्याने ही दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीमुळे त्या भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांतर आणि स्थित्यंतरामुळे पक्ष संपत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.