काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळेच नेते भाजपा किंवा शिवसेनेत यायला तयार होते. त्यापैकी निवडक लोकांना आम्ही आमच्यात घेतलं. शब्द थोडा चुकीचा आहे मात्र ज्यांना पचवता येईल का? अशांनाच आम्ही घेतलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पचवणं म्हणजे काय? असं विचारण्यात आल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, “पचवणं म्हणजे असे लोक जे भाजपाच्या संस्कृतीला अनुसरून काम करु शकतील एवढाच आहे” असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अनेक काँग्रेस नेत्यांनी आणि राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी आम्हालाच निवडलं होतं. मात्र अनेकांना आम्ही हात जोडून सांगितलं की तुम्ही आहात तिथेच राहा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या एबीपी माझा आणि लोकसत्ताच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं.
१२४ आणि १६४ हा समसमान फॉर्म्युला आहे असं म्हणायचं का? असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मित्रपक्षांच्या जागा सोडून समसमान असं ठरलं होतं. त्याप्रमाणे जागावाटप झालेलं आहे. शिवसेनेला ते मान्य आहे आम्ही सोबत चाललो आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एफआयआर दाखल झाल्यानंतर ईडीने ती सगळी नावं त्या यादीत समाविष्ट केली. ईडी कुठलाही एफआयआर दाखल करु शकत नाही. आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यावरच ईडी त्यासंदर्भात चौकशी करते, एफआयआरमध्ये जी नावं होती ती नावंच ईडीच्या यादीत आली. ईडीची यादी येताच विरोधकांनी बोंब ठोकणं सुरु केलं की आमच्याविरोधात सरकार काम करतं आहे. आमची तोंडं बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची इमेजच करप्ट आहे की त्यांच्याबाबत लोकांना नवल वाटत नाही.
ज्यांचा कारभार स्वच्छ आहे त्यांच्याबद्दल लोकांना सहानुभूती वाटते राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जे भाजपात आले त्यांंचं काय? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की ज्यांच्यावर ईडीची चौकशी आहे अशा कुणालाही भाजपात घेणार नाही हे आधीच सांगितलं होतं. त्याप्रमाणे आम्ही ईडीची चौकशी असणाऱ्या कुणालाही भाजपात प्रवेश दिलाच नाही असंही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलं.